‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी तयार करण्याचं वचन दिलं होतं, असं उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं. यावरून आता नवा वाद सुरू झाला आहे. भाजपाकडून उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर टीका करण्यात आली. उद्धव ठाकरेंना त्यांच्या घरातील व्यक्तीलाच मुख्यमंत्रीपद द्यायचे होते, हे आज मनातलं बाहेर आलं, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांनी केली. त्यानंतर आता अमरावती येथे महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा कौर यांच्या प्रचार सभेत बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“आज तर कहर झाला. खरं बोलण्यासाठी विचार करावा लागत नाही. पण खोटं बोलायला विचार करावा लागतो. एकदा खोटं बोललं की वारंवार खोटं बोलायला लागतं. मग कुठेतरी पोल-खोल होते. आज उद्धव ठाकरेंची पोलखोल झाली. माझे जुने मित्र उद्धव ठाकरे थोडे भ्रमिष्ट झाले आहेत. आज ते म्हणाले, आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीमध्ये जाईन. त्यांना वेड लागलं असेल. पण मला तर वेड लागलेलं नाही”, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली.

“फडणवीस म्हणाले होते, ते आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि स्वत:…”, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा!

हो, आदित्यबाबतचा तो सल्ला मी दिला

“माझा सवाल आहे. कालपर्यंत यांना भ्रम होता की, अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना कुठल्यातरी खोलीत नेऊन त्यांना मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला. पण आज त्यांचा भ्रम बदलला आहे. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी एक काहीतरी ठरवावे. अमित शाह यांनी शब्द दिला की देवेंद्र फडणवीसने शब्द दिला. उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झालेले असून खुर्ची गेल्यानंतर त्यांना काहीही समजत नाही. आज मी जाहीर करतो की, आदित्य ठाकरेंना निवडणूक लढविण्याचा सल्ला मी दिला होता. पुढे जाऊन आदित्य ठाकरेकडे पक्ष सोपवायचा आहे, त्यामुळे त्याला काहीतरी प्रशिक्षण मिळाले पाहीजे. पण त्याला मुख्यमंत्री तर सोडा, पण मंत्री बनवायचाही माझा विचार नव्हता”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

यातून एक गोष्ट निश्चित झाली. मी मुख्यमंत्री नाहीतर माझा मुलगा मुख्यमंत्री, असा आपल्या परिवाराचा विचार उद्धव ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीतीली तीनही पक्षांचे नेते फक्त स्वतःच्या मुलांचा आणि कुटुंबाचा विचार करणारे आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे-पुढे कुणी नाही. ना परिवार, ना घर आहे. ते फक्त देशातील गरिब जनतेचा विचार करतात. त्यामुळे घरणेशाही बाळगणारे कितीही पक्ष पुढे आले तरी ते मोदींना पराभूत करू शकणार नाहीत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.