माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहेत. या व्हिडीओमध्ये गाडीत बसलेला एक तरूण पोलिसांशी बाचाबाची करताना दिसत आहे. तसंच हा तरूण म्हणजे शिवसेना खासदार विनायक राऊत यांचा मुलगा असल्याचा दावा राणे यांनी केला आहे. दरम्यान, त्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

“शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्या मुलाने एका पोलिसाला शिवीगाळ केली. भर पावसात एक पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत आणि खासदारांचा मुलगा दारू पिऊन शुद्धीत नसल्यासारखा त्यांना धमकी देत आहे. दारू पिऊन गाडी वेडीवाकडी चालवली तर पोलीस पकडणारचं. त्या तरूणावर कलम ३५३ आणि १८५ अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे,” असं निलेश राणे म्हणाले. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून यासंबंधी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

“सिंधुदुर्गातील कणकवली बाजारपेठेत संध्याकाळी ५ ते ६ च्या दरम्यान ही घटना घटली. पोलिसांशी हुज्जत घालणारी व्यक्ती ही १०० टक्के विनायक राऊत यांचा मुलगाच आहे. तो मुलगाही व्हिडीओमध्ये विनायक राऊत यांना मुलगा असल्याचं सांगत आहे,” अशी प्रतिक्रिया राणे यांनी टिव्ही ९ मराठीशी बोलताना दिली. “खासदाराचा मुलगा असल्यामुळे अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. ज्या भाषेत तो तरूण त्या पोलिसांना धमकी देत आहे त्यानुसार कलम ३५३ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. दाऊ पिऊन जर कोणी असे प्रकार करत असेल तर त्याला तुरूंगात टाकलंच पाहिजे,” असंही ते म्हणाले.

“शिवसेना नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपण निवडून आलो म्हणजे महाराष्ट्र विकत घेतल्यासारखं वाटत आहे. महाराष्ट्रच आपलं काही देणं लागतो असं हे लोक वागत आहेत,” असंही राणे यावेळी म्हणाले.