आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा – शिवसेना युती झाली असली युतीतील आणखी एक मित्रपक्ष असलेल्या आरपीआयचे (आठवले गट) नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सत्ताधाऱ्यांना इशाराच दिला आहे. शिवसेना – भाजपा युतीने दलित मतांना ग्राह्य धरु नये, असा शब्दात आठवले यांनी युतीवर नाराजी व्यक्त केली आहे.

राज्यात शिवसेना- भाजपा युती झाली असून आगामी लोकसभा निवडणूक भाजपा २५ तर शिवसेना २३ जागा लढणार आहेत. जागावाटपावरुन आता रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. भाजपा- शिवसेना युतीत रिपब्लिकन पक्षाचे स्थान काय, असा प्रश्न विचारला असता आठवले म्हणाले, मी शिवसेना- भाजपा नेत्यांवर नाराज आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पक्षाला दुय्यम स्थान दिले. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून यात शिवसेना २३ आणि भाजपा २५ जागा लढवणार आहे. त्यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी एकदा आमच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते. मी मुंबई उत्तर पूर्व किंवा मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत आम्हाला किमान एक जागा आणि विधानसभा निवडणुकीत किमान आठ जागा आम्हाला द्यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

तुम्ही युतीतून बाहेर पडणार का, असा प्रश्न विचारला असता आठवले म्हणाले, सद्य स्थितीत युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे ही घाई ठरु शकते. देशभरातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. रिपब्लिकनने २०१४ मध्ये युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. पण भाजपा- शिवसेनेने दलित मतांना ग्राह्य धरु नये. त्यांनी आमचा आदर करावा आणि मगच आमच्याकडून आदराची अपेक्षा करावी, असे त्यांनी शिवसेना- भाजपाला सुनावले आहे.