दरातील तेजीमुळे ग्राहकांना लाल मिरचीचा तडका बसला असतानाच लाल मिरचीपासून तयार केल्या जाणाऱ्या काळय़ा मसाल्यासाठी लागणाऱ्या मसाल्याच्या दरातही तब्बल ५० टक्के वाढ झाली आहे. साहजिकच मसाल्याचा झणझणीतपणा ग्राहकांच्या खिशाला चांगलाच झोंबणार आहे.
दैनंदिन आहार चवदार व स्वादिष्ट व्हावा, म्हणून मसाल्याचा वापर करण्याची प्रथा जुनीच आहे. मार्च ते मे दरम्यान घरोघरी न चुकता वर्षभर लागणारा काळा मसाला तयार केला जातो. लाल तिखट व काळा मसाला बाजारातून खरेदी करण्यापेक्षा तो घरी बनवण्याकडेच अनेकांचा कल असतो. काळे तिखट तयार करण्यासाठी सुमारे २१ ते २२ मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. एक किलोचा काळा मसाला तयार करण्यासाठी लागणारी सामग्री भली मोठी असते. धने २५० गॅ्रम, ओवा ५० गॅ्रम, मेथी ५० गॅ्रम, त्रिफळा १० गॅ्रम, काळी मिरी १० गॅ्रम, लवंग १० गॅ्रम, नाकेश्वर १० गॅ्रम, शहाजिरे १० गॅ्रम, रामपत्री १० गॅ्रम, दालचिनी १० गॅ्रम, जिरा ५० गॅ्रम, सुंठ ५० गॅ्रम, खसखस ५० गॅ्रम, तमालपत्र ५० गॅ्रम, दगडफूल ५० गॅ्रम, खोबरे २५० ग्रॅम, जावेत्री १० गॅ्रम, जायफळ १ नग, मायफळ १ नग, बादीया (कर्णफुल) १० गॅ्रम, मसाला विलायची (जंगली) १० ग्रॅम या सर्व वस्तू तेलात भाजून, त्यात वाळवलेला कांदा भाजून, लाल मिरची टाकून एकत्रित कांडले की झणझणीत काळा मसाला तयार होतो.
मसाल्याच्या पदार्थाचे उत्पादन देशातच होते. हे सर्व पदार्थ जंगली व पहाडी भागात उत्पादित होतात. या सर्व पदार्थाना वनौषधी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या सेवनाने शरीराची भूक व प्रतिकारशक्ती वाढते. एक किलो मिरचीचा काळा मसाला तयार करण्यास गेल्या वर्षी सुमारे २०० रुपयांचे मसाल्याचे पदार्थ खरेदी करावे लागत असत. या वर्षी सर्वच दरांत वाढ झाली असल्यामुळे याचा खर्च ३०० रुपयांपर्यंत येत आहे. सध्या किरकोळ बाजारात धान्याचे भाव १२० ते १४० रुपये प्रतिकिलो, ओवा २०० ते २२, त्रिफळा २२५ ते २३०, काळी मिरी ८०० ते ९००, लवंग १००० ते ११००, नाकेश्वर ६०० ते ८००, मसाला विलायची १५०० ते १६००, दालचिनी २२५ ते २५०, खसखस ५२५ ते ६००, सुंठ ४०० ते ४५०, शहाजिरे ७०० ते ८००, रामपत्री ८०० ते ९००, बादीया २२० ते ३००, जिरा १४० ते १६०, दगडफूल ४५० ते ५००, पत्ती १०० रुपये, जावेत्री २०० ते २२० प्रतिकिलो दराने विकले जाते.
लग्नसराई, तसेच वार्षिक खरेदीमुळे बाजारपेठेत या पदार्थाना चांगलीच मागणी आहे. मसाल्याच्या प्रत्येक पदार्थाचे गुणधर्म वेगवेगळे असतात. त्रिफळा ही औषधी वनस्पती. चवीला तिखट, झणझणीत. काळी मिरे पोटाचे विकार कमी करण्यासाठी याचा वापर होतो. लवंग खाण्यास तिखट, पण शरीरास थंड. घशाचे त्रास कमी करण्यासाठी याचा वापर होतो. दालचिनी अतिशय उष्ण. रक्त शुद्धीकरणाचे काम व शरीरात ऊर्जा वाढवते. रामपत्री अतिशय थंड. मूळव्याधीवर उपचार म्हणून याचा वापर होतो. नाकेश्वर मसाल्याची चव वाढवण्यासाठी वापरतात. मसाला विलायची चवदार व सुगंधी. शहाजिरे अतिउष्ण व चवदार, शिवाय भूकवाढीसाठी उपयुक्त. बादीया अतिशय सुगंध व शीत. जिरे खमंग व भूकवाढीसाठी उपयुक्त. सुंठ पित्त कमी करण्यासाठी. खसखस शीत म्हणून, तर जावेत्री सुगंधी व शरीरास पोषक गणली जाते. लातूर बाजारपेठेत सध्या याची मोठी उलाढाल आहे. ग्राहकांची मोठय़ा प्रमाणावर झुंबड उडत असल्याचे लाल मिरची असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप स्वामी यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2014 रोजी प्रकाशित
काळे तिखटही ‘झणझणीत’!
दरातील तेजीमुळे ग्राहकांना लाल मिरचीचा तडका बसला असतानाच लाल मिरचीपासून तयार केल्या जाणाऱ्या काळय़ा मसाल्यासाठी लागणाऱ्या मसाल्याच्या दरातही तब्बल ५० टक्के वाढ झाली आहे. साहजिकच मसाल्याचा झणझणीतपणा ग्राहकांच्या खिशाला चांगलाच झोंबणार आहे.
First published on: 14-05-2014 at 01:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Black spice also more pungant