तालुक्यातील अनकवाडी येथे शेतात काम करणाऱ्या युवकाने हल्ला करणाऱ्या बिबटय़ाशी दोन हात करीत त्यास पळवून लावले. या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तालुक्यातील अनकवाडी शिवारातील शेतात सकाळी काम करणाऱ्या अशोक काळे (२९) यांच्यावर अचानक बिबटय़ाने हल्ला केला. अंगावर झेप घेणाऱ्या बिबटय़ाशी अशोकने दोन ते तीन मिनिटे झुंज दिली.

त्याने उचलून फेकल्यानंतर बिबटय़ा पळाला. अशोकच्या आरडाओरडीमुळे परिसरातील शेतकरी धावतच आले. त्यांनी जखमी अशोकला धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. या घटनेमुळे अनकवाडीसह परिसरात खळबळ उडाली असून वन विभागाने बिबटय़ाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.