जिल्ह्य़ातील जामनेर शहरात भावाने बहिणीची अतिशय क्रूरपणे हत्या करून नंतर स्वत:ही गळफास घेतला. हा प्रकार सोमवारी सकाळी आई-वडिलांच्या लक्षात आला. या घटनेचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर येथे नगारखाना भागात राहणाऱ्या राजेंद्र बारी यांचा मुलगा विवेकने रविवारी मध्यरात्री शेजारील खोलीत झोपलेली बहीण भाग्यश्रीचा (२३) तीक्ष्ण हत्याराने खून केला. त्यानंतर विवेकने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी बराच वेळ होऊनही दोघे खाली का आले नाहीत, हे पाहण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांना मृतदेह पाहून धक्का बसला. दोघेही भोवळ येऊन खाली कोसळले. विवेक हा जळगावच्या देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयात, तर भाग्यश्री ही एम. फार्मचे शिक्षण घेत होती. नगारखाना भागात दोन मजली असलेल्या इमारतीत आई-वडील खालच्या मजल्यावर, तर बहीण-भाऊ वरील मजल्यावर अभ्यास करतात. या घटनेबद्दल वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.