विरार पूर्वेतील नारंगी बायपास रस्त्यावरील नाना अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

विरार पूर्वेतील नारंगी बायपास रस्तालगत १३ वर्षे जुनी नाना अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे.या इमारतीमध्ये २ विंग असून सध्या स्थितीत या ठिकाणी २७ कुटुंब राहत आहेत. गुरुवारी सकाळी अचानकपणे या इमारतीचा काही भाग कोसळून गेल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वसई विरार महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीमधील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने बाहेर काढले. मात्र इमारतीचा सज्जा तळ मजल्यावर असलेल्या दुकानांवर कोसळल्याने दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवींतहानी झाली नाही. परंतु कमकुवत झालेल्या इमारतीमुळे इथल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आधीच करोनाचे संकट त्यात इमारत कोसळण्याची घटना यामुळे नागरिकांनी अधिकच चिंता व्यक्त केली आहे.

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात अशा अनेक जुन्या इमारती असून त्यात हजारो लोक राहात आहेत.या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.