पीक कर्जासाठी शेतकरी महिलेचा मोबाइल क्रमांक घेऊन त्यावर अश्लील संभाषण केल्याचा प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. धामणगाव बढे येथे ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

खांडवा येथील पीडित शेतकरी महिलेने जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेत पीक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला होता. जिल्हा बँक शाखेचा निरीक्षक सुधाकर अजाबराव देशमुख (५१) याने २२ सप्टेंबरला फिर्यादीचा मोबाइल क्रमांक घेऊन त्यावर संपर्क साधून वाईट उद्देशाने ‘मी तुझे जास्तीचे कर्ज मंजूर करून देतो’ असे म्हणून अश्लील भाषेत संवाद साधला. या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुधाकर देशमुख विरूद्ध भादंवि कलम ३५४ अ (२) सह कलम ३ (१), अनुसुचित जाती जमाती अधिनियम प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला रविवारी अटक करण्यात आली.

आरोपी देशमुखला जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. यापूर्वीही बुलढाणा जिल्हय़ाच्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बॅँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी राजेश हिवसे आणि शिपायाने पीक कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीर सुखाची मागणी केली होती. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेतील कर्मचाऱ्याने शेतकरी महिलेस कर्जमंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी केल्याची घटना संतापजनक आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा नराधमाचा फैसला फास्टट्रॅक कोर्टात करावा. महाराष्ट्रातील लेकींच्या अब्रुशी खेळणाऱ्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.