अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पीकहानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक बुधवारी सकाळी विदर्भात दाखल झाले. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्हय़ातील काही गावांना भेटी देऊन पथकाने पीकांच्या हानीची तसेच सिंचन प्रकल्प, रस्ते, पूल, पडलेली घरे व शासकीय इमारतींची पाहणी केली. तर उद्या हे पथक चंद्रपूर जिल्हय़ातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करेल.या पथकाच्या अहवालानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत.
पश्चिम विदर्भातील काही जिल्हे वगळता विदर्भातील सर्व जिल्हय़ांना जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी व पुराचा फटका बसला. पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हय़ांत पीकहानी, सिंचन प्रकल्प, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, पूल, घरे व शासकीय इमारतींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात विदर्भातील सर्वच पक्षाच्या आमदारांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याची दखल घेत अतिवृष्टीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तसेच बाधित कुटुंबांसाठी १९३४ कोटीचे पॅकेज जाहीर केले. हे पॅकेज पुरेसे नाही, अशी भावना आमदारांनी व्यक्त केल्यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन विधिमंडळात दिले होते. त्याची पूर्तता करण्यासाठीच केंद्राचे दोन सदस्यीय पथक दाखल झाले.
या पथकात केंद्रीय कापूस महामंडळाचे संचालक एस. एम. कोल्हटकर व रस्ते परिवहनचे संचालक आर.पी. मीणा यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबत नागपूर विभागाचे आयुक्त गोपाल रेड्डी, नागपूरचे जिल्हाधिकारी व कृषी खात्याचे राज्यातील वरिष्ठ अधिकारी आहेत.
या पथकाने भंडारा जिल्हय़ातील वाही, आकोट, वासेरा, कोसरा, भावाड, पवनी तालुक्यातील रनडा, लाखांदूर तालुक्यातील किरीमीटी, दोनाड, रोहनी, कुडेगाव तर गोंदिया जिल्हय़ातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा, इटखेडा, माहूरखेडा, बोरी या गावांना भेट देवून देखील पिकांच्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. भंडारा व गोंदिया जिल्हय़ांत पीक, रस्ते, पूल व लोकांच्या घरांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद पथकाने घेतली आहे. या पथकाबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मोठा ताफा आहे.