जून २०११ मध्ये शोध लागलेला धूमकेतू ‘पॅन स्टार’ हा सूर्याच्या जवळून जाईल आणि आपल्याला तो १३ ते १५ मार्च या कालावधीत सूर्यास्तानंतर पश्चिम क्षितिजावर पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी दिसण्याची शक्यता कमी असल्याने द्विनेत्री अर्थात ‘बायनॅक्युलर’च्या साहाय्याने तो पाहता येईल. परंतु, डोळ्यांना काही इजा होऊ नये, याकरिता सूर्याचा पूर्ण अस्त झाल्यानंतरच दुर्बिणीतून (बायनॅक्युलर) धूमकेतूचे निरीक्षण करावे, असे आवाहन खगोलतज्ज्ञ प्रा. गिरीश पिंपळे यांनी केले आहे.
साधारणत: १२, १३ व १४ मार्च रोजी सूर्यास्तानंतर जर पश्चिम क्षितिजाजवळ ढग किंवा धुके नसेल तर कमीतकमी छोटय़ा दुर्बिणीतून तो दिसू शकेल. जून २०११ मध्ये ‘पॅन स्टार’ शोधला गेला. तो सध्या सूर्याच्या जवळ आलेला आहे. तो आपल्याला १३ ते १५ मार्चपर्यंत सूर्यास्तानंतर पाहावयास मिळणार आहे. पश्चिम क्षितिजावर पाहावयास मिळेल. सगळ्यात चांगला १३ मार्चला दिसेल. या दिवशी चंद्रकोर धूमकेतूच्या उजव्या बाजूस किंवा किंचित वर असेल. पण त्यानंतरच्या दिवशी म्हणजे १४ व १५ रोजी चंद्रकोर त्याच्याजवळ असेल. चंद्रकोरीची तीव्रता वाढत जाईल आणि धूमकेतूच्या शेपटीचा शेवटचा मंद भाग दिसायला अवघड जाईल. त्यामुळे चंद्रकोरीचा प्रकाश त्याच्यावर पडल्याने तो तितका तेजस्वी दिसणार नाही. हा धूमकेतू साध्या डोळ्यांनी दिसण्याची शक्यता कमी आहे. तो पाहण्यासाठी दुर्बिणीची मदत घ्यावी लागेल. परंतु, त्याबाबत अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. कारण, सूर्यास्त होत असताना सूर्याकडे दुर्बीण रोखायची नसते. सूर्याचा पूर्ण अस्त झाल्यानंतर दुर्बीण तिकडे रोखून धूमकेतू पाहता येईल. सूर्यास्तावेळी सूर्याची प्रखरता कमी असली तरी डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. यामुळे सूर्य पूर्ण खाली गेल्यानंतरच बायनॅक्युलरचा वापर करणे आवश्यक आहे. साधारणत: पश्चिम क्षितिजावर नऊ अंश उंचीवर हा धूमकेतू दिसेल. याचा अर्थ तो क्षितिजालगत दिसणार आहे. त्यामुळे निरीक्षणाची जागा खगोलप्रेमी नागरिकांना आधीच निवडावी लागेल. ही जागा अशी हवी की, पश्चिम क्षितिज स्पष्टपणे दिसू शकेल. झाड किंवा इमारतीचा त्यात अडथळा नको. पश्चिमेकडील क्षितिज मोकळे असेल, अशी जागा निरीक्षणासाठी निवडावी, असेही प्रा. पिंपळे यांनी म्हटले आहे. या धूमकेतूचा शोध १.८ व्यासाच्या रोबोटिक दुर्बिणीने लावला होता. ही दुर्बीण हवाई बेटातील हेलिकला शिखरावर आहे. शोध लागल्यानंतर निरीक्षणातून असे दिसून आले की, हा धूमकेतू चांगला प्रखर होईल. इतका की तो आपल्याला नुसत्या डोळ्यांनीही सहज दिसेल. पण गेल्या काही आठवडय़ांत घेतलेल्या निरीक्षणांतून असे दिसून येत आहे की, हा म्हणावा तितका प्रखर होणार नाही.