मालेगाव:  मुंबईविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असहमती व्यक्त केली आहे. मालेगाव दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यपाल हे मोठे पद असल्याने त्यांच्याकडून कुणाचा अवमान होणार नाही, याची काळजी घेतली गेली पाहिजे, असे सांगितले. मुंबईला आर्थिक राजधानी करण्यात मराठी माणसाचे योगदान मोठे आहे. त्यासाठी १०६ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. मुंबईवर आलेल्या अनेक संकटांना तोंड देण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम उभे राहिले. मुंबईत मराठी माणसाने एक अस्मिता जपली. मराठी माणसाच्या मेहनतीमुळे मुंबईला वैभव प्राप्त झाले आणि त्यामुळेच मुंबई आर्थिक राजधानी झाली असल्याचे शिंदे यांनी नमूद केले. या मुंबईने अनेकांना पोटापाण्याचा व्यवसाय उपलब्ध करून दिला आहे. राज्यपालांनी त्यांच्या विधानासंदर्भात खुलासा दिला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

  कुणाला दुखावण्याचा हेतू नसावा – फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दोंडाईचा येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्राच्या जडणघडणीसह विकासाच्या वाटचालीत मराठी माणसाचेही योगदान मोठे आहे. महाराष्ट्रामुळे जगभरात मराठीचे नाव पोहचले आहे. महाराष्ट्राच्या विकासात इतरांचाही सहभाग आहेच. म्हणून मराठी माणसाचे महत्त्व कमी होत नाही. एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर अतिशयोक्ती अलंकारयुक्त शब्दांचा वापर करून भाषण करणे गरजेचे असते. राज्यपालांनीही बहुधा त्याच हेतूने हे वक्तव्य केले असावे. कुणालाही दुखावण्याचा त्यांचा हेतू नसावा. इतकेच नव्हे तर, राज्यपालांच्या मनात मराठी माणसाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल कुठलाही आकस नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.