सांगली : सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात सोमवारी बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद-उल-अजहाची नमाज अदा करण्यासाठी हजारो मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर जमले होते. मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी शाही ईदगाह मैदानावर गर्दी केली होती. सांगलीमध्ये ईदची नमाज सकाळी ९ वाजता अदा करण्यात आली. ईदची प्रार्थना झाल्यानंतर मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प व लहान मुलांना खाउ देउन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसच्या नेत्या व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हेही वाचा : “देशात जाती जनगणना करण्यात यावी”, छगन भुजबळांची मोठी मागणी; म्हणाले, “ही जनगणना झाली तर ओबीसींना…” मिरज येथील शाही ईदगाह येथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन सामूहिक नमाज अदा केली. यावेळी नमाज पठण हाफिज निजामुद्दीन संदीनी केले. धार्मिक विधी प्रवचन खुदबा पठण मोहम्मद जयेद खतीब यांनी केले. बायान ब्रुद्रुद्दीन खतीब व मुफ्ती मोहम्मद सुफिया यांनी केले. विविध सामाजिक संघटनांकडून चॉकलेट, बिस्कीट व गुलाब पुष्प देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. मिरजेत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस उप अधिक्षक प्रविण गिल्डा, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, गजेंद्र कुल्लोळी, जैलाबदीन शेख, डॉ. महेशकुमार कांबळे आदी उपस्थित होते.