विरोध करणाऱ्यांना प्रसंगी गजाआड पाठवण्याचा इशारा

राज्यातील आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या काळातच शिवसेनेकडून भाजपवर जोरदार हल्ले सुरू असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही शिवसेनेविरोधात आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानविरोधी भूमिकेतून तेथील कलावंतांना विरोध केला जात असेल, तर मित्रपक्ष असले तरी त्यांची गय केली जाणार नाही, वेळ पडल्यास त्यांना गजाआड करून योग्य ती सजा दिली जाईल असा सज्जड इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी मुंबईत कार्यक्रम करावा, आमचे सरकार त्यांना संपूर्ण सुरक्षा देईल अशा शब्दांत गुलाम अली यांना निमंत्रण देत त्यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे.
मुंबईतील एका माध्यमसमूहाशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा खरपूस समाचारच घेतला. गेल्या वेळी गुलाम अली यांच्या कार्यक्रमासाठी सरकारने त्यांनी सुरक्षेची हमी दिली होती, परंतु आयोजकांनीच माघार घेतल्याने तो कार्यक्रम झाला नव्हता. आता गुलाम अली यांनी मुंबईत यावे, आमचे सरकार त्यांना सुरक्षेची संपूर्ण हमी देईल आणि त्यांचा कार्यक्रम विनाव्यत्यय पार पाडण्याची जबाबदारीही घेईल, असे फडणवीस यांनी या वार्तालापात जाहीरपणे सांगितले. गुलाम अली यांच्यासारख्या कलावंताकडे धर्म वा देशाच्या पलीकडील भावनेने पाहिले पाहिजे, आणि अशा पाहुण्यांना राजधर्म म्हणून संपूर्ण सुरक्षा देताना त्यामध्ये कोणीही अडथळे आणत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, प्रसंगी त्यांना गजांआड करण्यातही हयगय केली जाणार नाही, असेही फडणवीस यांनी बजावले.

गुलाम अली यांच्यासारख्या कलावंताकडे धर्म वा देशाच्या पलीकडील भावनेने पाहिले पाहिजे, आणि अशा पाहुण्यांना राजधर्म म्हणून संपूर्ण सुरक्षा देताना त्यामध्ये कोणीही अडथळे आणत असेल तर त्याची गय केली जाणार नाही.
– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले..

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारचा होता.
कसुरी यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत असा त्याचा अर्थ नाही, पण राजधर्माचे पालन करण्यासाठीच सरकारने त्यांना सुरक्षा दिली
शिवसेना हा आमच्या सरकारमधील भागीदार पक्ष आहे, सरकारमध्ये आम्ही समन्वयानेच काम करीत असतो
शिवसेनेकडून सरकारवर केल्या जाणाऱ्या टीकेमुळे राष्ट्रीय स्तरांवरील माध्यमांमध्ये गैरसमज पसरत आहेत