भावी पतीसोबत शिर्डीला जात असताना अपहरण झालेल्या तरुणीच्या तक्रारीवरून धुळे जिल्ह्य़ातील शिरपूर येथील कुंटणखान्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या नगर पोलिसांना शनिवारी रिकाम्या हाताने परतावे लागले. कुंटणखाना बंद तर होताच शिवाय तेथील लोकांनीही पोबारा केल्याचे दिसून आले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
येथील तरुणी भावी पतीसोबत शिर्डीला जात असताना तिचे नगर येथील बिगबाजारजवळ अज्ञात लोकांनी तिला बेशुद्ध करून अपहरण केले. त्यानंतर तिला शिरपूर येथील कुंटणखान्यात नेले. तेथून तिच्या भावी पतीला दूरध्वनी करून त्याच्याकडे खंडणीची मागणी केली. मात्र, तरुणीने तेथून सुटका करून घेत पुणे गाठले. पुण्यात पोलिसांकडे तक्रार केली. पुणे पोलिसांनी तिला तिची तक्रार नगर पोलिसांकडे वर्ग करण्याचा सल्ला दिला. मात्र, नगरला अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी तिला व तिच्या पतीला खोटी तक्रार आणली म्हणून मारहाण केली व तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. हतबल तरुणीने पुण्यात येऊन ही कर्मकहाणी पुन्हा पोलिसांना सांगितली, तेव्हा कोरेगावपार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी जबाब नोंदवून घेतला. या तरुणीस उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व प्रकारानंतर नगर पोलिसांनी शिरपूर येथील कुंटणखान्यावर शनिवारी छापा टाकला. मात्र, ती जागा बंद असल्याचे आढळून आले. तसेच तेथील लोकांनीही पोबारा केला. पोलिसांनी तरुणीच्या भावी पतीला ज्या क्रमांकावरून खंडणीसाठी दूरध्वनी करण्यात आले होते त्या क्रमांकांवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते बंद असल्याचे आढळून आले.दरम्यान, शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी या संपूर्ण प्रकाराची सीआयडी चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे केली आहे.तरुणीला मारहाण करणाऱ्या पोलिसांचीही चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.