व्यापाऱ्यांचा १०० टक्के प्रतिसाद
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्य़ाच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘बंद’ ला भोकरमध्ये १०० टक्के प्रतिसाद मिळाला. बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने ‘बंद’ मध्ये सहभाग नोंदवला.
गेल्या २२ जानेवारी रोजी भोकर येथील हनुमाननगर परिसरातील प्रांगणात विश्व हिंदू परिषदेतर्फे हिंदू हितचिंतक मेळाव्याचे आयोजन केले होते. या वेळी तोगडिया यांनी हैदराबाद येथील एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. तोगडिया यांच्या भाषणामुळे एकच खळबळ उडाली. केंद्र सरकारने तोगडिया यांचे भाषण तपासून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
तोगडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल होताच हिंदुत्ववादी संघटना खडबडून जाग्या झाल्या. त्यातूनच ‘भोकर बंद’ चे गुरुवारी आयोजन करण्यात आले. ‘बंद’ मध्ये शिवसेना, भाजपा, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी संघटना सहभागी झाल्या. शहरातील सर्व प्रतिष्ठाने, हॉटेल्स, किराणा दुकाने, शाळा, महाविद्यालय बंद होते. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रकाश कौडगे, जिल्हाप्रमुख प्रकाश मारावार, भाजपाचे राजेश करपे, विहिंपचे साईनाथ रेड्डी, बजरंग दलाचे प्रशांत पोपशेटवार, योगेश देशपांडे यांच्यासह अनेकांनी भेट देऊन ‘बंद’ मध्ये सहभागी व्यापाऱ्यांचे आभार मानले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.
विश्व हिंदू परिषद, भाजपा, शिवसेना, बजरंग दलासह अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तोगडिया यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्य़ाचा तीव्र निषेध केला. तोगडियांविरुद्ध दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी शिष्यमंडळाने केली.