बारामती : लोकाभिमुख असलेल्या महायुती सरकारने आतापर्यंत ७५ हजार युवकांना नोकरी दिली आहे. भविष्यात एक लाख ६० हजार युवकांना नोकरी दिली जाणार असून, नोकरभरतीचा लाभ आता मराठा समाजालाही होणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी बारामतीमध्ये दिली. तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानाच्या कला, शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या नमो महारोजगार मेळावाच्या उद्घाटन कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा, सुनेत्रा पवार आणि आमदार दत्तात्रय भरणे या वेळी उपस्थित होते. बारामती पोलीस उपमुख्यालय आणि पोलिसांचे निवासस्थान या इमारतींचे व बारामती एसटी बसस्थानकाचे उद्घाटनही शिंदे यांच्या हस्ते झाले.

हेही वाचा >>> राहुल गांधींचा देश तोडण्याचा डाव; रामदास आठवले यांचा हल्लाबोल

शिंदे म्हणाले, की नमो महारोजगार मेळावा ही नोकरीसाठी सुवर्णसंधी आहे. राज्यामध्ये यापूर्वी नागपूर, लातूर, नगर या ठिकाणी रोजगार मेळावा घेण्यात आला. या महारोजगार मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतरबारामती येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

फडणवीस म्हणाले, की पश्चिम महाराष्ट्रामध्ये नमो महारोजगार मेळावा घेण्यात आला. त्यामध्ये ५५ हजार पदे अधिसूचित करण्यात आली आहेत. यातून अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अजित पवार म्हणाले, की उद्योजकांनी आपले उद्याोग वाढवून नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. भारताबाहेर अनेक देशांमध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत.

हेही वाचा >>> सांगलीत हळदीला ३२ हजाराचा उच्चांकी भाव

जर्मनीमध्ये अनेक नोकऱ्या उपलब्ध असून, त्या संधीचे सोने करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. राज्यातील विकास कार्यामध्ये आता बारामतीचा पहिला क्रमांक लागेल, असा मला विश्वास वाटतो.

रोजगाराच्या मुद्द्यावर शरद पवारांची सरकारला साथ

रोजगारनिर्मितीकडे सरकारने लक्ष दिल्याने त्यांचे आभार मानतो. राजकारण बाजूला राहिले, पण मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या मुद्द्यावर आमची साथ राहील, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. पवार म्हणाले, रोजगाराशी संबंधित हा कार्यक्रम आहे. राज्य सरकारला मी धन्यवाद देऊ इच्छितो, की आज रोजगार निर्माण करण्याची गरज आहे आणि राज्य सरकार ते काम करत आहे. राजकारण बाजूला राहिले. तरुणांना आधार देत आहेत, अशी भूमिका असेल, तर सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. तीच भूमिका घेऊन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देतो, की तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी तुम्ही जे कराल त्यासाठी तुम्हाला साथ असेल. दरम्यान, शरद पवार व्यासपीठावर येताच मेळाव्याला उपस्थित तरुणांनी जल्लोष केला.

सुप्रिया सुळे यांची टीका

नमो रोजगार मेळाव्यातून सुरुवातीला ४३ हजार नोकऱ्या मिळणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ३० नोकऱ्या मिळणार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांपैकी अनेक पदे ही प्रशिक्षणार्थींची आहेत. त्यामुळे हा महारोजगार मेळावा नसून, महास्किल कार्यक्रम असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde inaugurates namo job fair in baramati zws