कराड: राहुल गांधी एकीकडे भारत जोडो यात्रा काढत आहेत आणि दुसरीकडे देशाला तोडण्याचा, समाजात फूट पाडण्याचा त्यांचा डाव आहे. काँग्रेस व काही पक्षांनी केंद्रातील भाजप सरकार संविधान बदलणार अशी अफवा पसरवून समाज तोडण्याचेच काम  केल्याचा हल्लाबोल केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला. सध्या राहुल गांधींनी काँग्रेस पक्ष जोडण्याचेच काम करणे त्यांच्या फायद्याचे असल्याचा परखड सल्लाही आठवले यांनी या वेळी दिला.

हेही वाचा >>> सांगलीत हळदीला ३२ हजाराचा उच्चांकी भाव

साताऱ्यात ते पत्रकारांशी बोलत होते. ‘रिपाइं’चे (आठवले गट) प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. काँग्रेस पक्षच जोडण्याचे त्यांनी काम करावे रामदास आठवले म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष सोडून अनेक दिग्गज मंडळी भाजपात जात आहेत. तरी राहुल गांधी यांनी देश जोडण्याऐवजी काँग्रेस पक्षच जोडण्याचे काम करणे त्यांच्या हिताचे ठरेल. राहुल गांधींचा देशभर फिरून  काहीही उपयोग होणार नाही, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला. आसामसह अन्य राज्यातील काँग्रेस व अन्य पक्षातील लोकप्रतिनिधी व नेते मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश करीत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देश जोडण्याऐवजी स्वत:चा पक्ष जोडण्याचे काम करण्यात त्यांचा फायदा होणार असल्याचे आठवले म्हणाले.

हेही वाचा >>> नांदेड : अपघातात परीक्षार्थी दोन विद्यार्थी ठार; एक गंभीर

‘एनडीए’ला चांगला प्रतिसाद

केंद्र सरकारच्या कामगिरीमुळे देश गतीने पुढे जात आहे. परिणामी सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) चांगला प्रतिसाद असल्याचा विश्वास देताना, काँग्रेसच्या सत्ताकाळात मात्र, देशाचा विकास गतीने  झाला नाही अशी टीका आठवले यांनी केली.

काँग्रेसला लक्ष द्यायला वेळच नव्हता

नरेंद मोदी पंतप्रधान झाल्यावर अनेक चांगल्या गोष्टी झाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिथे संविधान लिहिले त्या ठिकाणी  त्यांचे दीडशे कोटींचे स्मारक उभारण्याचे काम केले. काँग्रेसच्या सत्तेच्या कालावधीत आंबेडकर फाउंडेशन स्थापन झाले. पण, तिथे केवळ एक कार्यालय होते. काँग्रेसला त्यावेळी लक्ष द्यायला वेळच नव्हता. याउलट नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच त्यांनी साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये खर्चून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र उभारले. इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेबांचे स्मारक उभारण्याचे काम  युद्धपातळीवर सुरू आहे. तिथे डॉ. बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारला जात असल्याचे आठवलेंनी सांगितले.

राहुल गांधींचा देश तोडण्याचा डाव

राहुल गांधी एकीकडे भारत जोडो यात्रा काढत आहेत आणि दुसरीकडे देशाला तोडण्याचा, समाजात फूट पाडण्याचा त्यांचा डाव आहे. काँग्रेस व काही पक्षांनी केंद्रातील भाजप सरकार संविधान बदलणार अशी अफवा पसरवून समाज तोडण्याचेच काम  केल्याचा हल्लाबोल आठवले यांनी केला.

संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून सर्वांना समान संधीचा अधिकार दिला. अन्य धर्माच्या लोकांनाही समान न्याय देण्याचा अधिकार संविधानात असल्याने ते बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा दावा रामदास आठवले यांनी केला.

काँग्रेसला संविधान दिवसाचा विसर

डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याकडे २६ नोव्हेंबरला संविधानाचा मसुदा सुपूर्द केला. हा दिवस काँग्रेसच्या लक्षात नव्हता, पण नरेंद्र मोदी यांनी हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. संविधान सभेतील सर्वांचेच योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही योगदान आहे, पण, डॉ. बाबासाहेबांना कमी महत्व देण्याचे काम काँग्रेसने केले. डॉ. बाबासाहेबांचा हा अपमान आम्ही सहन करणार नाही. संविधान बदलणार नाही आणि संविधान संरक्षणासाठीच मी मंत्रिमंडळात असल्याचे रामदास आठवले यांनी ठामपणे सांगितले.