अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरून सुंदोपसुंदी पाहायला मिळाली. मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन, त्यापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं उत्तर, अर्थसंकल्पातल्या तरतुदी अशा अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी व विरोधक आमने-सामने पाहायला मिळाले. त्यापाठोपाठ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी शिंदे गटातील आमदार महेंद्र थोरवे व मंत्री दादा भुसे यांच्यातील वादाचाही मुद्दा चर्चेत आला. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या भाषणात जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांना टोले लगावले. उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले अशा विरोधी पक्षातील नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी लक्ष्य केलं. तसेच, कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर विरोधकांना आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

Thackeray group, Gaikwad,
कल्याणमध्ये ठाकरे गट आणि गायकवाड समर्थक छुप्या युतीच्या चर्चा ? भाजप आमदारांचा शिंदेंना पाठींबा, आमदार पत्नी मात्र ठाकरेंच्या उमेदवारासोबत
तप्रधान नरेंद्र मोदी चंद्रपूर सभा लोक सभा निवडणूक २०२४
“…तेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वत: काँग्रेसविरोधात उभे राहिले होते”, पंतप्रधान मोदींकडून काश्मीरचा उल्लेख करत हल्लाबोल!
cm eknath shinde yavatmal lok sabha marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात..”; अखेर राजश्री पाटील यांचाच उमदेवारी अर्ज दाखल
Eknath Shinde slams Uddhav Thackray on Narendra Modi
पंतप्रधान मोदींना औरंगजेबाची उपमा, मुख्यमंत्री शिंदेंचा संताप; म्हणाले, “ज्याने स्वतःच्या भावाला..”

“विरोधकांची स्क्रिप्ट सारखीच”

“विरोधकांची विरोधाची स्क्रिप्ट सारखीच आहे. एका स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो. त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत आहेत. मुद्दा नसला की मग अपशब्द वापरायचे, आरोप करायचे. मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचं. पक्ष चोरला, चिन्ह चोरलं म्हणत राहायचं. हे सगळं रोजच चालू आहे. स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी असा कांगावा करणं हास्यास्पद आहे. विरोधकांनी मर्दासारखं बोलावं. जाहीरपणे बोलावं. आम्हाला खोके खोके म्हणणाऱ्यांनी आमच्याच खात्यातून ५० कोटी घेतले आहेत. त्याची चौकशी चालू आहे. शिवसेनेच्या खात्यातते त्यांनी घेतले आहेत”, असा आरोप एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटावर केला.

“काही लोक सभागृहात बोलण्यापेक्षा बाहेर मीडियात बोलण्यात धन्यता मानतात. विधिमंडळाचं कामकाज घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही. काहीजण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहात हजेरी लावतात हेही माहिती आहे”, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंवर टीका

दरम्यान, सरकार जोमात, शेतकरी कोमात अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे सरकारवर टीका केली होती. त्यावरूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टीका केली. “शेतकरी कोमात आहे असं कुणीतरी म्हणालं. अशी भावना चुकीची आहे. पण शेतकरी नव्हे, विरोधी पक्ष कोमात गेलाय की काय अशी स्थिती दिसतेय”, असं ते म्हणाले.

“ज्यांच्या कार्यकाळात खुद्द गृहमंत्री तुरुंगात गेले, पोलिसांना हाताशी धरून आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी राज्यात खंडणीखोरी व्हायची. ते रॅकेट उघड झालं. साधूंचं हत्याकांड झालं. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकलं. केंद्रीय मंत्र्यांना जेवणाच्या ताटावरून उचलून जेलमध्ये टाकलं. कंगणा रनौतचं घर तोडण्यासाठी महापालिकेचे ८५ लाख रुपये खर्च केले. हा काय अहंकार आहे? कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार विरोधकांना नाही”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

“ये अंदर की बात है!”

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाना पटोलेंनी मारलेल्या कोपरखळीवरून सभागृहात चांगलाच हशा पिकला. “मी स्वत:ला सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजत नाही. मी सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो. मला अजिबात इगो नाही”, असं एकनाथ शिंदेंनी म्हणताच मागून शंभूराज देसाई यांनी “नानांना नाही पटलं हे”, असा टोला लगावला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी “नानांना माहिती आहे. त्यांनाही मी त्यांचा मुख्यमंत्री वाटतो”, अशी टिप्पणी केली.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर समोर बसलेल्या नाना पटोलेंनी “ते माझ्यामुळे मुख्यमंत्री झाले”, अशी कोपरखळी मारली. यावर एकनाथ शिंदेंनी “हे खरं आहे. विजयराव (विजय वडेट्टीवार), ये अंदर की बात है. हे सगळं ठरलेलं होतं”, अशी मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात हशा पिकला. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी “बसून बोललेल्या इतर गोष्टी रेकॉर्डवर घेतल्या जात नाहीत. पण हे अपवाद म्हणून घेतलं जाईल”, असं म्हणताच पुन्हा हास्याची लकेर उमटली.