केंद्रीय नारळ बोर्डाच्यावतीने कोकणासाठी २६ हजार ५० हेक्टर क्षेत्रात नारळ पीक विमा योजनेचे उद्दिष्ट असून सिंदुदुर्ग जिल्ह्य़ासाठी १२७० हेक्टर क्षेत्रात एक लाख ९० हजार नारळ झाड विमा योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वानीच पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय नारळ बोर्डाचे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी केले आहे.
केंद्रीय नारळ बोर्डाच्यावतीने कोकणातील चार जिल्ह्य़ांत नारळ पीक विमा योजना राबविली जात आहे. त्यासाठी २६ हजार ५० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी सन २०१२-१३ साठी १२७० हेक्टर क्षेत्राचा समावेश असून एक लाख ९० हजार नारळ झाडांचा विमा उतरविला जाणे आवश्यक असल्याचे राजाभाऊ लिमये यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील तालुकानिहाय क्षेत्र व उद्दिष्ट पुढीलप्रमाणे- वैभववाडी तालुका २५ हेक्टर क्षेत्र ३७५० नारळ झाडे, कणकवली तालुका ९४ हेक्टर क्षेत्र १४ हजार १०० झाडे, देवगड १७५ हेक्टर क्षेत्र ११ हजार २५० झाडे, मालवण २१० हेक्टर क्षेत्र १६ हजार ५०० झाडे, कुडाळ १५० हेक्टर क्षेत्र २२ हजार ५०० झाडे, वेंगुर्ले १९० हेक्टर क्षेत्र १३ हजार ५०० झाडे, सावंतवाडी २५० हेक्टर क्षेत्र ३७ हजार ५०० झाडे, तर दोडामार्ग १७५ हेक्टर क्षेत्र ११ हजार २५० झाडांचा विमा उरतविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
कोकणात सन १०-११ मध्ये ९०० हेक्टर, सन ११-१२ मध्ये १४०० हेक्टर, तर सन १२-१३ मध्ये २६५० हेक्टर क्षेत्राचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी बोलताना सांगितले.
केंद्रीय नारळ बोर्डाच्यावतीने नारळ पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. नारळ बागायतदार, समूह गट व शेतकऱ्यांनी विमा योजनेत समाविष्ट होण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून विमा योजनेत समाविष्ट होण्यासाठी विमा रक्कम जमा करावी, असे आवाहन राजाभाऊ लिमये यांनी केले आहे.
नारळ बागायतदारांनी आणखी उद्दिष्ट वाढवून मागितल्यास देण्यास तयार आहोत, असे राजाभाऊ लिमये यांनी सांगून कोकणातील नारळ बागायतदारांनी संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले.