लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपसाठी कठीण होत आहेत. सोलापूरची जागा थोडी कठीण आहे. तर माढ्याची जागा जास्त कठीण असल्याची कबुली सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यामुळे तापलेल्या राजकीय वातावरणात हा चर्चेचा विषय झाला आहे.

मंगळवेढा येथे चंद्रकांत पाटील हे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या प्रचार यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी बैठकीत त्यांनी सोलापूर व माढ्यात भाजपची स्थिती कठीण असल्याची स्पष्ट कबुली दिली. काही दिवसांपूर्वी अशी परिस्थिती अजिबात नव्हती. मात्र अचानक ज्या घडामोडी झाल्या, त्यातून अडचण निर्माण झाली. परंतु आता कार्यकर्त्यांनी आधिक ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

आणखी वाचा-रामनवमीचे औचित्य साधून हिंदुत्व काँग्रेसचे अन् भाजपचे…

शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत जिल्हा विकास निधीसह अन्य विकास निधीचा वाटा शिवसेनेला अपेक्षित प्रमाणात मिळत नसल्याची तक्रार शिवसेना जिल्हा प्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी केली.