जळगाव, मालेगाव : उत्तर महाराष्ट्रात गलितगात्र अवस्थेत असणाऱ्या काँग्रेसला गटबाजीचे राजकारण संपवून ऊर्जितावस्था देण्याची धडपड जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून झाली. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या जळगावमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करून काँग्रेस नेत्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. सातपुडा पर्वतराजीत वसलेला नंदुरबार हा गमावलेला बालेकिल्ला असो किंवा धुळे, नाशिक जिल्ह्य़ातील इतर मतदारसंघ असोत. सर्वत्र स्थानिक प्रश्न आणि लोकभावनेला साद घालण्याचा काँग्रेसी नेत्यांचा प्रयत्न राहिला.

उत्तर महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रेद्वारे काँग्रेसने पक्षात चैतन्य निर्माण करणे आणि जनतेला भेडसावणारे प्रश्न मांडून सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरणनिर्मितीसाठी उपयोग केल्याचे दिसून आले. त्यात काही ठिकाणी सटाण्यासारखे वेगळे अनुभवही आले. सटाणा येथील जाहीर सभेत काही युवकांनी ‘हर हर मोदीं’च्या घोषणा देत प्रदेशाध्यक्षांच्या भाषणात अडथळे आणले. जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला जळगाव जिल्ह्य़ातून प्रारंभ झाला. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह सुमारे २५ माजी मंत्री आणि आमदारांनी दोन दिवस संपूर्ण जिल्हा पिंजून काढला. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्य़ात केंद्र, राज्य शासनावर टीकेची झोड उठवली, परंतु माजी मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप करण्यापेक्षा स्थानिक राजकारणाला हात घालत भाजपच्या मर्मावर बोट ठेवण्याची खेळी काँग्रेसने केली. यात खडसेंना सहानुभूती देत महाजन यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करण्यात आले. संघर्ष यात्रेला मिळालेल्या प्रतिसादाने जिल्ह्य़ातील काँग्रेस नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

कॉँग्रेसचे ५१वे राष्ट्रीय अधिवेशन फैजपूर येथे १९३६ मध्ये तत्कालीन अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत झाले. यामुळे काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी फैजपूरची निवड केली. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार अशोक चव्हाण यांच्यासह नेत्यांची फौजच उपस्थित होती. फैजपूर हे रावेर लोकसभा मतदारसंघात येते. काँग्रेसचे अस्तित्व नावापुरतेच दिसून येते. असे असताना काँग्रेसने प्रतिष्ठा पणाला लावून जनसंघर्ष यात्रेचा शुभारंभ केला. भाजपच्या बालेकिल्ल्यात सरकारने मंजूर करून नंतर पुन्हा रद्द केलेल्या केळी संशोधन केंद्र, कापूस संशोधन केंद्र, जळगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र, खान्देश विकास महामंडळ, दुष्काळ, नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना मदत, बोंडअळीची मदत, भुसावळातील आयुध निर्माणी, भुसावळचा रेल्वे प्रकल्प आदी मुद्दय़ांना काँग्रेसने हात घातला. खडसेंमुळे हे प्रकल्प मंजूर झाले, परंतु आता या घोषणांची स्थिती काय आहे, असा प्रश्न करत जो पक्ष स्वपक्षाच्या खडसेंना झाला नाही, तो पक्ष तुमचा-आमचा काय होणार, अशा शब्दात काँग्रेस नेत्यांनी भाजपवर टीका केली.

उत्तर महाराष्ट्रातील अनेक भाग दुष्काळाच्या छायेत आहे. त्यामुळेच यात्रेत दुष्काळाचा मुद्दा उचलून धरण्यात आला. मालेगावमध्ये विधानसभेचे दोन मतदारसंघ आहेत. त्यातील मुस्लीमबहुल मालेगाव मध्य मतदारसंघात काँग्रेसचा बोलबाला आहे. या मतदारसंघात सध्या आसिफ शेख यांच्या रूपाने काँग्रेसचा आमदार असून सेनेच्या मदतीने या पक्षाने महापालिकेतील सत्तादेखील आपल्या ताब्यात ठेवली आहे. दुसरीकडे मालेगाव बाह्य़ मतदारसंघात काँग्रेसची स्थिती फारच केविलवाणी आहे. पक्षाची अवस्था दिवसागणीक खालावत आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी पक्षाकडून फार काही प्रयत्न झाले असे गेल्या काही वर्षांत आढळून आले नाही. जनसंघर्ष यात्रेत बाह्य़ मतदारसंघात जाहीर सभेचे झालेले आयोजन तसेच वरिष्ठ नेत्यांची जोशपूर्ण भाषणे आणि स्थानिक नेत्यांना बळ देण्याची हमी यामुळे पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न झाला.

रावेर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची मोर्चेबांधणी

रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मात्र तेथे त्यांचा सातत्याने पराभव होत भाजपचे उमेदवार विजयी होतात. गेल्या पंचवार्षिकला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार उल्हास पाटील यांनी या भागातून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. यंदादेखील ते प्रयत्नशील आहेत. फैजपूर येथील सभेत त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा, अशी मागणी केली. यावर अशोक चव्हाण यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्यासाठी आपण वकिली करू, असे आश्वासन दिले.