अलिबाग :  श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आदिती तटकरे यांच्या विरोधात काँग्रेसच्या तीन बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे तटकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शिवसेनेबरोबर आता काँग्रेसच्या बंडखोरांना थोपविण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.

आघाडीच्या जागावाटपात श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आला. मात्र हा निर्णय स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांच्या पचनी पडलेला नाही. काँग्रेसचे ज्ञानदेव पवार, डॉ. मोईज शेख आणि दानिश लांबे या तिघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पक्षातील बंडखोरी करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाणार असल्याची घोषणा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धनमधून सुनील तटकरे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते.

जर  कुणी बंडखोरी केली तर कारवाईचा इशारा यापूर्वीच दिला होता. त्यानुसार आज बंडखोरी करणाऱ्या तिन्ही पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल.

 – माणिक जगताप,  काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष