विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी टीका करून केली.
विधानसभेतील काँग्रेसचे नेते राधाकृष्ण पाटील यांनी राज्य सरकारने घोषित केलेल्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे काहीच नाही. भाजप-शिवसेनेने विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांसाठी अनेक मागण्या केल्या होत्या. त्यापैकी किमान निम्म्या तरी पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने दोन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. राज्य सरकारने ज्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत, त्याचा लाभ तरी राज्यातील शेतकऱ्यांना द्यायला हवा होता, परंतु त्यातही राज्य सरकारने केवळ विदर्भ आणि मराठवाडय़ासाठी घोषणा करून इतर विभागातील दुष्काळग्ररस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. हा प्रकार प्रांतवादाला खतपाणी घालणारा ठरण्याची भीती विखे पाटील यांनी व्यक्त केली.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले, दुष्काळात सरकारकडून नेहमी ज्या उपाययोजना केल्या जातात, त्याच उपाययोजना एकत्रित करून सरकारने ७ हजार कोटींचे फसवे पॅकेज तयार केले आहे. कर्जमाफी, व्याजमाफी, विविध प्रकारच्या सिंचनासाठी तरतूद, पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना, रोजगार हमीची कामे, वीज बील माफी, शेतकऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शुल्कातून सवलत या सर्व नियमितपणे केल्या जाणाऱ्या बाबी आहेत. दुष्काळाला तोंड देताना काँग्रेस सरकारने अशाच उपाययोजना केल्या होत्या सोबतच रोख रक्कमेचीही मदत केली होती.
राज्य सरकारच्या तथाकथित पॅकेजमध्ये एकरी किती मदत मिळेल ते स्पष्ट नसल्याने हे पॅकेज आत्महत्येच्या गर्तेत फसलेल्या शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी ठरणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले पॅकेज त्यांना दिलासा देणारे नाही. मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या इतर भागात पडलेल्या दुष्काळ बघता जाहीर केलेले पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे. पुरवणी मागण्यामध्ये मदत व पुनर्वसनासाठी केवळ २ कोटीची तरतूद असल्यामुळे इतर निधी कुठून आणणार आहे, असेही पवार म्हणाले.