राज्यात नवे सरकार स्थापन होऊन महिना झाला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्ताराची चिन्हे दिसत नाहियेत. मंत्रिमंडळ विस्तारासाठी लागणाऱ्या विलंबामुळे विरोधी पक्षाकडून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सराकारवर निशाणा साधला आहे. “सरकार कोसळण्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला” असल्याची टीका पटोलेंनी शिंदे- फडणवीस सरकारवर केली आहे.

हेही वाचा- अतिवृष्टी बाधितांच्या मदतीवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली; ‘सात सात महिने तुम्ही मदत केली नाही’वाल्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी सुनावलं

घटनाबाह्य सरकार

राज्यात ईडीचे सरकार आहे त्यामुळे ब्लॅकमेलिंग आणि दबावतंत्र होणारच. राज्याच्या विकासकामांनाही शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली आहे. घटनेनुसार नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणे बंधनकारक आहे. अद्याप हा विस्तार झाला नसून हे सरकार घटनाबाह्य असल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला आहे.

दिल्ली सरकारच्या दबाबखाली राज्य सरकारचे काम

राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारीखेनंतर अजून एक तारीख दिली जाते. पण हे कोर्ट नाही. दिल्ली सरकारच्या दबाबाखाली येऊन हे नवे सरकार काम करत आहे. पक्षाची दोरी त्यांना सांभाळता येत नाही. सरकार कोसळेल या भीतीमुळे मंत्रिमंडळ विस्तारास विलंब लागत असल्याचा टोला पटोलेंनी लगावला आहे.

हेही वाचा- अजित पवार काँग्रेस खासदाराला भेटले, अपक्ष आमदाराच्या घरी गेले पण स्वपक्षीय नेत्यांच्या घरी जाणं टाळलं; चंद्रपूरातील राष्ट्रवादीत अस्वस्थता

अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान

राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमधील पीकं पाण्याखाली गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार झाल नसल्यामुळे राज्य सरकारकडून अद्याप नुकसानग्रस्त भागांचा दौऱा करण्यास उशीर होत आहे. परिणामी हवालदील शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलताना दिसत आहे. सरकारकडून वेळेत मदत जाहीर होत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पहाणी दौरा करुन शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे.