शेती महामंडळ कामगारांच्या प्रश्नात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. राज्य सरकार या कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. बंद पडलेले सहकारी साखर कारखाने मोडीच्या भावात विकून साखर कामगारांना वाऱ्यावर सोडणाऱ्या नेत्यांना कामगार संघटनांनी विरोध केला नाही. या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असून, त्याची तसेच हे साखर कारखाने विकत घेणाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली. विखे यांच्या टिकेचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होता.
शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या साखर कामगार व शेती महामंडळ कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी मेळाव्याचे उद्घाटन विखे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गोिवदराव आदिक होते. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कामगार संघटनांचे अविनाश आपटे, बबनराव पवार, सुभाष कुलकर्णी, सुभाष काकुस्ते, आनंद वायकर, राजेंद्र बावके, ज्ञानदेव आहेर आदी अनेक नेते या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.