महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत राज्यात सामोपचाराने मिटविलेल्या तंटय़ांमध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी स्वरूपाच्या तंटय़ांचे असून सर्वात कमी प्रमाण महसुली तंटय़ांचे आहे. मोहिमेच्या प्रारंभीच्या चार वर्षांत तब्बल ८ लाख ११ हजार ४१९ फौजदारी तर ३३,३९९ महसुली स्वरूपाचे तंटे मिटविण्यात यश आल्याचे गृह विभागाने म्हटले आहे. या व्यतिरिक्त दिवाणी स्वरूपाचे ६२,४५८ तर इतर स्वरूपाचे ६८,२५५ तंटे मिटले आहेत. पाचव्या वर्षांतील मिटलेल्या तंटय़ांची आकडेवारी समाविष्ट झाल्यानंतर या प्रमाणात आणखी वाढ होईल.
या मोहिमेचे सध्या सहावे वर्ष सुरू असून पाचव्या वर्षांत तंटामुक्त ठरलेल्या गावांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तथापि, त्या वर्षांत मिटलेल्या तंटय़ांची आकडेवारी अद्याप जाहीर झालेली नाही. परंतु, तत्पुर्वीच्या चार वर्षांचा आढावा घेतल्यास सामोपचाराने मिटणाऱ्या तंटय़ांमुळे न्यायालयांवरील भार काही अंशी हलका झाल्याचे लक्षात येते. कारण, गावात अस्तित्वातील व नव्याने निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत आतापर्यंत थोडे थोडके नव्हे तर एकूण ९ लाख ७५ हजार ५३१ वेगवेगळ्या स्वरूपाचे तंटे मिटविण्यात यश मिळाले आहे. या मोहिमेत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम ३२० मध्ये नमूद केलेले दखलपात्र गुन्हे मिटविता येतात. तसेच अदखलपात्र गुन्हेही मिटविता येतात. या शिवाय, महसुली, दिवाणी व इतर तंटे सामोपचाराने मिटविण्याची विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करून देण्यात आली आहे.
आजपर्यंत या मोहिमेतंर्गत ग्रामीण भागात मिटविलेल्या तंटय़ांमध्ये सर्वाधिक प्रमाण फौजदारी तंटय़ांचे असल्याचे दिसून येते. मोहिमेच्या पहिल्या वर्षी म्हणजे २००७-०८ मध्ये २,०७,११५, दुसऱ्या वर्षांत १,६०,१८९, तिसऱ्या वर्षी २,१८,८१३ आणि चवथ्या वर्षांत म्हणजे २०१०-११ वर्षांत २,२५,३०२ इतके फौजदारी तंटे मिटविण्यात आले. याच कालावधीत दिवाणी स्वरूपाचे अनुक्रमे २०६६३, १०२३९, १४६९९ आणि १६८५७ इतके तंटे तर महसुली स्वरूपाचे ८३४७, ६६५७, ८५५७ आणि ९८३८ इतके तंटे सामोपचाराने मिटविण्यात आले.
याशिवाय, सहकार, कामगार, औद्योगिक क्षेत्र अशा इतर तंटय़ांच्या गटात या चार वर्षांत अनुक्रमे २८४९२, १५१८९, १३२७२ आणि ११३०२ तंटे मिटविण्यात आले आहेत. मोहिमेच्या पाचव्या व सहाव्या वर्षांतही तंटे मिटविण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहिली. त्यांची आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर या प्रमाणात लक्षणिय वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.