लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या सुरू आहे. सर्वज राजकीय पक्षांचे नेते अनेक गौप्यस्फोट करत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्याबाबत अनेक नेते विधानं करत आहेत. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ‘मी जर त्यांच्यावर व्यक्तिगत वक्तव्य करायचं ठरवलं तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही’, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात अनेक सभा घेतल्या. या संदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबई हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला नाही. आम्ही हे वांरवार दाखवून दिलं आहे. मुंबईने नेहमीच भाजपा आणि महायुतीला साथ दिली आहे. आम्ही २०१४ ला पंतप्रधान मोदी यांच्या मुंबईत दोन सभा केल्या होत्या. मात्र, यावेळी आम्ही एक सभा आणि एक रोड शो केला. त्यामुळे मोदी यांना महाराष्ट्रात पुन्हा पुन्हा यावं लागतंय असं काहीही नाही. मोदींच्या पाठीशी मुंबईकर आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते टिव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत बोलत होते.

हेही वाचा : “होय, मी २००४ सालापासूनच…”, शरद पवारांचा दावा प्रफुल्ल पटेलांना मान्य; म्हणाले, “आमचा सतत अपमान…”

“उद्धाव ठाकरेंना घाटकोपरच्या घटनेवर बोलण्याचा अधिकार नाही. उद्धव ठाकरे यांचं सरकार या दुर्घटनेला जबाबदार आहे. याचं कारण त्यांच्या काळात या होर्डिंगला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली होती. या घटनेतील बेकायदेशीर होर्डिंग लावणारा भावेश भिंडे हा व्यक्तीही त्यांच्याच पक्षाचा माणूस आहे. अशा परिस्थितीत ते आम्हाला संवेदना शिकवतात. मग त्यांनी त्यांचा प्रचार बंद केला का? त्यांच्या सभा चालतात. शरद पवार हे तेथे जाऊन सभा करतात. मग मोदी तेथे रोड शो ला आले तर लगेच असंवेदनशील. खरं म्हणजे हे नाटकी आणि खोटे बोलणारे लोक आहेत. मला यांच्याबद्दल बोलतानाही वाईट वाटतं”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्रात मोदींच्या सभा का वाढल्या?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जेव्हा आमच्याबरोबर होती. तेव्हाही मोदींनी १३ सभा घेतल्या होत्या. आता सभा वाढण्याचे दोन कारणे आहेत. तेव्हा चार टप्प्यांत मतदान होतं. त्यामुळे सभा घेताना लिमिट येत होतं. मात्र, यावेळी महाराष्ट्रात मतदानाचे चार ऐवजी पाच टप्पे झाले आहेत. यातील अनेक टप्पे असे आहेत की त्यामध्ये सात दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे सभा घ्यायला आम्हाला जास्त स्कोप मिळाला. मागच्यावेळी असा स्कोप नव्हता. दुसरा भाग असा आहे की, आमच्याबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी आहेत. यांच्यात अर्थातच दोन भाग आहेत. त्यामुळे काही मते विभागली गेली आहेत. आमच्या नेत्यांना लोकं ऐकायला येतात तर आम्ही का बोलवू नये?”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांना इशारा

“४ जूनला शो कुणाचा हे आपल्याला समजेल. उद्धव ठाकरे यांनी प्रचारामध्ये जी खालची पातळी गाठली होती. त्यावरून असा प्रश्न पडतो की, ते दिल्लीची निवडणूक लढवतात की गल्लीची. ते ज्या शब्दांचा प्रयोग करतात. ते ज्या पद्धतीने बोलतात, ज्या प्रकारे ते टोमणे मारतात. हे एकाद्या पक्षाच्या प्रमुखाला शोभनिय नाही. त्यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका केली. मात्र तरीही मला काहीही फरक पडत नाही. त्यांनी कितीही व्यक्तिगत टीका केली तरी ते काय आहेत आणि मी काय आहे? हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. मी जर त्यांच्यावर व्यक्तिगत वक्तव्य करायचं ठरवलं तर त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मात्र मी असं करत नाही. कारण मी महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता आहे. त्यामुळे मी माझा एक स्तर ठेवला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis criticizes to uddhav thackeray lok sabha elections politics gkt
Show comments