लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची ध्वनिफीत विविध प्रचारसभांमध्ये ऐकवली गेली. त्यात ‘आता मी सारी जबाबदारी तुमच्यावर सोपवतो’ असे वाक्य होते. त्याचे पडसाद निवडणुकीदरम्यान दिसून आले. त्यानुसार सगळी जबाबदारी खरोखरच लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांवर येऊन पडल्याची चर्चा मतदानानंतर रंगली आहे.
मागील वेळच्या निवडणुकीत निलंगा, उदगीर, अहमदपूर व लोहा या चार विधानसभा मतदारसंघांत भाजप उमेदवाराला मताधिक्य होते. मात्र, लातूर शहर व लातूर ग्रामीण मतदारसंघांतील मतदारांनी काँग्रेसच्या पारडय़ात भरभक्कम मतांचे दान टाकल्यामुळे उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघांतील मिळालेले मताधिक्य घटून जयवंत आवळे ७ हजार १९५ मतांनी विजयी झाले होते. या वेळच्या लढतीत मात्र परिस्थिती बदलली. मतदारसंघाबाहेरील आवळे यांच्याऐवजी मतदारसंघातील उमेदवार, जि.प.चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे गुरुजी यांच्या रूपाने काँग्रेसने दिला, भाजपने जुनाच भिडू डॉ. सुनील गायकवाड िरगणात उतरवला. विलासराव देशमुख यांच्या गरहजेरीतील ही पहिलीच निवडणूक. त्यामुळे विलासराव नसण्याचे तोटे सहन करावे लागणार, हे काँग्रेसच्या मंडळींनी व्यूहरचना करतानाच लक्षात घेतले होते. आमदार अमित देशमुख यांनी निवडणुकीची सारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र, त्याचा कुठेही तोरा मिरवू न देता सर्व ज्येष्ठांना मान देत निवडणुकीची यंत्रणा राबवली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंडळींचाही योग्य तो सन्मान राखला. प्रारंभापासून मतदारांत संपर्क ठेवला. याउलट भाजपची मदार केवळ मोदी यांच्या करिष्म्यावरच अवलंबून होती. शेवटपर्यंत मतदारांपर्यंत केवळ मोदीच पोहोचले.
काँग्रेसविरोधी मतदान होईल, याचा अंदाज सुरुवातीपासून व्यक्त केला जात होता. निलंगा, उदगीर, अहमदपूर व लोहा या मतदारसंघांवर काँग्रेस व भाजप या दोघांनीही लक्ष केंद्रित केले होते. याही वेळी या चारही मतदारसंघांतून भाजपलाच मताधिक्य मिळेल, अशी चर्चा आहे. फक्त  मताधिक्य मागच्या वेळेइतके असेल की कमी? यावर चर्चेचा रोख असून भाजपला मताधिक्य मिळणारच, याची खात्रीही दिली जात आहे. हे मताधिक्य घटवण्याची जबाबदारी लातूर शहर व लातूर ग्रामीण या दोन विधानसभा मतदारसंघांवर असेल, हेही या निमित्ताने बोलून दाखवले जात आहे.
लातूर शहर व ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांवर काँग्रेसचे प्रभुत्व आहे. लातूर शहर मतदारसंघातून आमदार अमित देशमुख यांना ९० हजारांपर्यंत मताधिक्य मिळाले होते, तर ग्रामीणमध्ये आमदार वैजनाथ िशदे २५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. मोदींची लाट गृहीत धरली, तरी काँग्रेसच्या मतांमध्ये लगेच घट होईल असेही नाही, असा काँग्रेसच्या मंडळींचा दावा आहे. या दोन्ही मतदारसंघांत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मांजरा, विकास व रेणा या तीन सहकारी साखर कारखान्यांचे लाभधारक मोठय़ा प्रमाणात आहेत. जिल्हा बँक व विविध सहकारी संस्थांची गोड फळे सभासदांना चाखता आली आहेत. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा किमान १० टक्के मते अधिक मिळतील, असा दावाही काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. या दोन विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसला चांगले मताधिक्य मिळाल्यानंतर भाजप उमेदवाराचा टिकाव लागणारच नाही, असाही दावा केला जातो.
याउलट लातूर शहरातील लोक पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, एलबीटी व कचरा यामुळे चांगलेच वैतागले आहेत. शहरातील मतदारांना काँग्रेसची मंडळी गृहीत धरतात, त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते अशी लोकांची भावना झाली आहे. ग्रामीण मतदारसंघातील जनतेकडे साखर कारखान्याच्या माध्यमातून सुबत्ता आली, हे खरे असले तरी त्यातूनच परावलंबित्वाची भावना कमी झाली असल्यामुळे कोणी कोणाला मोजायला तयार नाही. गावागावांतील प्रस्थापितांविरोधात सामान्य लोक उभे राहात असून त्याचा फटका काँग्रेसला बसेल, अशीही सर्वसाधारण चर्चा आहे. लातूर शहर व ग्रामीण या दोन्ही मतदारसंघांत तुलनेने कमी मताधिक्य काँग्रेसला मिळेल व अन्य मतदारसंघांत भाजपला जास्त मताधिक्य मिळाल्यास भाजपचा उमेदवार विजयी होईल या चच्रेने सध्या जोर धरला आहे. गावोगावचे कट्टे, शहरातील पानठेल्यांवर या चच्रेला रंग चढला आहे. १६ मेपर्यंत ही चर्चा सुरूच राहणार आहे.