युवक काँग्रेसच्या शहर सरचिटणीस कल्पना गिरी यांच्या हत्येची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी तिच्या पालकांनी पत्रकार बैठकीत केली.
कल्पनाचे वडील मंगल गिरी म्हणाले की, माझी मुलगी स्वकर्तृत्वाने पुढे येत होती. केवळ महिला असल्याने तिचे खच्चीकरण केले जात होते. कल्पनाच्या मृत्यूमागे घातपात असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मोबाईल तपासावेत आणि जे कोणी या गुन्हय़ास पाठीशी घालत आहेत त्यांना तत्काळ अटक करावी. आपल्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे व हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पप्पू कुलकर्णी, संपर्कप्रमुख धोंडू पाटील, गणेश गिरी व गिरी कुटुंबीय उपस्थित होते.
सेना जिल्हाप्रमुख कुलकर्णी यांनी, काँग्रेस पक्षात महिला पदाधिकाऱ्यांवर अत्याचार होत आहेत, ही खेदाची बाब आहे असे सांगून आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. शहरातील कायदा-सुव्यवस्था पूर्ण ढेपाळली असून, येथील अधिकारी पुढाऱ्यांच्या सांगण्याप्रमाणे वागत आहेत. या प्रकरणात पोलिसांवर राजकीय दबाव येण्याची शक्यता असून, तपास नि:पक्ष होण्यासाठी तो सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस महासंचालकांकडे निवेदन देऊन केली आहे. गिरी कुटुंबीयांवर कोणत्याही प्रकारे दबाव येऊ नये, यासाठी त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणीही निवेदनात केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलकर्णी, स्त्री आधार केंद्राचे अॅड. नंदकुमार ढेकणे, महानंदा भारती यांनी गिरी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
दरम्यान, कल्पनाच्या मारेकऱ्यांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा मुख्य संघटक छाया गिरी यांनी पत्रकाद्वारे दिला. कल्पनाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. भटक्या समाजातील एका युवतीवर हल्ला करून या समाजातील कार्यकर्त्यांना संपवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. मारेकऱ्यांना अटक न केल्यास राष्ट्रवादी महिला आघाडी व गोसावी समाजसेवा संघाच्या वतीने जिल्हाभर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करावे, अशी मागणी महाराष्ट्र युवा विकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष विकास कांबळे, मिथुन गायकवाड, राज वाघमारे आदींच्या सह्य़ा आहेत.