कल्याण : इतिहासकालीन, चित्रपट अभिनय क्षेत्रातील जुन्या व्यक्तिंच्या छायाचित्रांची तोडमोड करून त्या जागी राज्याचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा सामायिक करून फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका इसमा विरुध्द आंबिवलीमधील एका तरूणाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
खडकपाडा पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून गजाभाऊ या नावाने एक्सवर (टि्वटर) गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करणाऱ्या इसमा विरुध्द बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. प्रथमेश अनंत पाटील असे तक्रारादाराचे नाव आहे. तो अटाळी आंबीवली भागात राहतो. पोलीसांनी सांगितले, गजाभाऊ या एक्स (टि्वटर) खात्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा चित्रपटातील गब्बर सिंग या खलनायकाशी, इतिहासकालीन अफझलखानाच्या क्रूर प्रतिमेशी सामायिक करून फडणवीस हे कसे अलीकडच्या काळातील खलनायक आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा…कल्याणमध्ये केस सजावटकार महिलेवर लैंगिक अत्याचार करून ठार मारण्याची धमकी
तसेच, एक महिलेच्या चेहऱ्याच्या प्रतिमेवर फडणवीस यांचा चेहरा सामायिक करून महाराष्ट्राचे सुस्त गृहमंत्रालय असे वाक्य लिहून गृह विभाग आणि महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने समाज असुरक्षितेतची भावना निर्माण केली. तसेच, विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीचे २० आमदार फोडले, कुणाला कळालेही नाही, असे फडणवीस यांच्या विषयी खोटे लिहून फडणवीसांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. गजाभाऊ या एक्स खात्यावरून ही बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे खडकपाडा पोलिसांनी या खात्याच्या वापरकर्त्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरू करून आरोपीला अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.