भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या गटाचा मोठा विजय झाला आहे. महाडिक गटाने १५ पैकी १५ जागांवर मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला आहे. या निवडणूकीत ‘पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात’ असं वादग्रस्त विधान करणाऱ्या राजन पाटील गटाचा सुफडा साफ झाला आहे. राजन पाटील यांच्या गटाच्या एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही.
या निवडणुकीत धनंजय महाडिक यांच्यासह त्यांचा मुलगा विश्वराज महाडिकही निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यामुळे ही निवडणूक महाडिक कुटुंबासाठी प्रतिष्ठेची बनली होती. अखेर या निवडणुकीत महाडिक गटाने बाजी मारली असून मोठा विजय संपादन केला आहे. या विजयाने धनंजय महाडिकांचं भीमा सहकारी साखर कारखान्यावर सलग तिसऱ्यांदा वर्चस्व स्थापित झालं आहे.




महाडिक यांच्या पॅनेलने सुमारे साडेसहा हजारांच्या फरकाने १५ पैकी १५ जागा जिंकल्या आहेत. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली भीमा परिवार, तर माजी आमदार राजन पाटील आणि प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली भीमा बचाव पॅनेल आमने-सामने आले होते. या निवडणुकीत ७९ टक्के मतदान झालं होतं. आज सोलापुरात मतमोजणी झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच महाडिक यांच्या पॅनेलने आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम ठेवत कारखाच्या इतिहास मोठा विजय नोंदवला आहे.
राजन पाटील नेमकं काय म्हणाले?
“ही निवडणूक भीमा कारखान्याची आहे की राजन पाटलांच्या कुटुंबाची आहे हेच कळायला मार्ग नाही. ते आमच्या पोरांना बाळ म्हणत आहेत. अरे आम्ही पाटील आहोत. याला माहितीच नाही की, पाटलाच्या पोराला लग्नाच्याही आधी यांच्याएवढी पोरं असतात. त्याचा आम्हाला अभिमान आहे. ते आमच्या पोरांना भीती दाखवत आहेत. आमची मुलं वयाच्या १७ व्या वर्षी ३०२ चं कलम भोगणारी आहेत” असं वक्तव्य राजन पाटील यांनी केलं होतं.