आपल्याकडे आलेल्या तक्रारीची दखल घेत धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची रविवारी (३० डिसेंबर) होणारी बैठक स्थगित करण्यात आली आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असताना या नियोजित बैठकीच्या वैधतेविषयीचे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
अभिनेते मोहन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या कार्यकारिणीची मुदत पाच वर्षांपूर्वी संपुष्टात आली. त्यानंतर निवडणुका टाळण्याच्या उद्देशातून सर्वसहमतीने त्यांनी विद्यमान कार्यकारिणीला आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, ही मुदतवाढ धर्मादाय आयुक्तांची मान्यता मिळण्याच्या प्रतीक्षेत होती. दरम्यानच्या काळात एका प्रकरणामध्ये मोहन जोशी यांना अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्याजागी उपाध्यक्ष हेमंत टकले यांची नाटय़ परिषदेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याप्रकरणी सुनावणी झाल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी या कार्यकारिणीची मुदत अमान्य केली. नाटय़ परिषदेची कार्यकारिणी बरखास्त करून नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले होते.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा वाढदिवस आणि १२-१२-१२ ही शतकातून एकदाच येणारी तारीख असा दुहेरी योग साधून ९३ वे अखिल भारतीय मराठी नाटय़संमेलन बारामती येथे घेण्याचा निर्णय नाटय़ परिषदेने घेतला. हे संमेलन सुरळीतपणे पार पडण्यासाठी विद्यमान कार्यकारिणीला काम करू द्यावे, अशी विनंती नाटय़ परिषदेच्या कार्यकारिणीने केली होती. धर्मादाय आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत ही विनंती मान्य केली. त्यानुसार हे संमेलन संपले असल्याने या कार्यकारिणीचा कार्यकाल संपुष्टात आला आहे.  
नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाची बैठक आता रविवारी (३० डिसेंबर) घेण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र, नाटय़ परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे या बैठकीच्या वैधतेविषयीचे प्रश्नचिन्ह उपस्थित करून धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्याची दखल घेत अशी बैठक घेऊ नये, असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आली असल्याचे ‘एसएमएस’ नियामक मंडळाच्या सदस्यांना बुधवारीच पाठविण्यात आले.
ही बैठक स्थगित करण्यात आली असल्याच्या वृत्ताला नाटय़ परिषदेचे अध्यक्ष हेमंत टकले आणि उपाध्यक्ष विनय आपटे यांनी दुजोरा दिला. विनय आपटे म्हणाले, तांत्रिक मुद्दे उपस्थित झाल्यामुळे रविवारची बैठक स्थगित करण्यात आली आहे. मलाही ‘एसएमएस’द्वारेच ही माहिती समजली. मात्र, तांत्रिक मुद्दे कोणते याविषयी हेमंत टकले यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नाही.
हेमंत टकले म्हणाले, नियामक मंडळ सदस्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे ही बैठक स्थगित करण्यात आली आहे. नवी कार्यकारिणी अस्तित्वात येईपर्यंत विद्यमान कार्यकारिणीला काळजीवाहू म्हणून काम पाहण्यास धर्मादाय आयुक्तांनी मंजुरी दिली असल्याने तांत्रिक मुद्याचा प्रश्न उपस्थित होत नाही.