किमान समान कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे आमच्या अटी-शर्थी आहेत. वेगळं असं काहीही लिहून दिलेलं नाही. संविधानाच्या चौकटीतून सरकार चालवण्यासाठी आम्ही बंधनकारक आहोत आणि तसंच सरकार चालणार असं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. हे वक्तव्य करुन एकनाथ शिंदे यांनी अशोक चव्हाण यांना उत्तर दिलं आहे. घटनाबाह्य काम करणार नाही असं शिवसेनेकडून लिहून घेतलं आहे असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं. एवढंच नाही तर शिवसेनेने उद्देशाबाहेर काम केलं तर सत्तेतून बाहेर पडू असाही इशारा त्यांनी दिला. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता किमान समान कार्यक्रमाशिवाय कुणालाही काहीही लिहून दिलेलं नाही असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

घटनाबाह्य काम करणार नाही, असं शिवसेनेकडून लिहून घेतलं असल्याचं सांगितलं आहे. तसंच शिवसेनेनं जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला. सोनिया गांधी यांचा तीन पक्षांच्या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले असंही यावेळी त्यांनी सांगितलं. नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.