बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्यात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाला. तर, १२ जण गंभीर जखमी झाले. तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्लॉट क्रमांक डी १७ मध्ये असलेल्या भगेरीया इंडस्ट्रीज या रासायनिक कारखान्यात कापड उद्योगात डाईंगसाठी आवश्यक गामा अ‍ॅसिडचे उत्पादन सुरू होते. या दरम्यान दुपारी साडेचार वाजता तापमान आणि दाब क्षमतेपेक्षा अधिक वाढल्याने ‘ऑटोक्लेव’मध्ये स्फोट झाला. या उत्पादन विभागात जवळपास १८ कामगार काम करीत होते. यामधील गोपाल गुलजारीलाल शिसोदिया (२७) आणि पंकज यादव (३२) या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर, १३  कामगार जखमी झाले. बोईसरमधील शिंदे रुग्णालयात जखमींना उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना सिकंदर कुमार गोस्वामी (४०) या  कामगाराचा मृत्यू झाला.

जखमींमध्ये मुकेश चेनू दास (३३), श्रवण मुरारी दास (३३), हिमांशू प्रमोद पाठक (३०), घनश्याम रामप्यारे निषाद,(४५), देवेंद्र कुबेर यादव (२२), अरुण ओमप्रकाश पटेल (२७ ), राजू कुंजीलाल पासवान (४०), हंसराज लालधारी यादव (४०), नारायण श्रीकिशोर मिश्रा (२४), सुनील हिरा, (३१) भवानी रामसजीवन, (१९), श्रीराम मनिलाल मेहता (१८) यांचा समावेश आहे.

भगेरीया इंडस्ट्रीजमध्ये गामा अ‍ॅसिडचे उत्पादन सुरू असताना अचानक स्फोट झाला, असे प्राथमिक चौकशीमध्ये स्पष्ट झाले. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. तर  १२ जण जमखी झाले आहेत.

-नरेंद्र देवराज, सहसंचालक , औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय