रस्त्यावरच्या ड्रेनेज लाईनमध्ये अडकून वडिल मुलाचा मृत्यू

इलेक्ट्रिक शॉक लागून किंवा ड्रेनेजमध्ये गुदमरून या दोघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रस्त्यावरच्या ड्रेनेज लाईनमध्ये अडकून वडिल मुलाचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील अवचित पाडा या भागात घडली आहे. ड्रेनेज लाईनमधून तबेल्यासाठी अनधिकृत पाणी वापरण्याचे काम हे दोघे करत होते. चंद्रकांत राठोड (वय-५०) आणि रमेश राठोड (वय १९) अशी या दोघांची नावं आहेत.

ड्रेनेज लाईनवर या दोघांनीही मोटर बसवली होती. आज सकाळपासून पाणी येत नव्हते. त्यामुळे मोटरमध्ये काही बिघाड झाला आहे का? हे पाहण्यासाठी रमेश गेला, तो बराच वेळ आला नाही म्हणून चंद्रकांत राठोड गेले. मात्र दोघेही ड्रेनेज लाईनमध्ये अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे. हे दोघे अडकल्याची माहिती मिळताच काही कामगारांनी या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना या प्रयत्नात यश आले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आले त्यांनी या दोघांना बाहेर काढले. बाहेर काढल्यावर या दोघांनाही उप जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

इलेक्ट्रिक शॉक लागून किंवा ड्रेनेजमध्ये गुदमरून या दोघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. शांतीनगर पोलीस या प्रकरणात पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे राठोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Father and son died in drainage line in bhiwandi