scorecardresearch

रत्नागिरी जिल्ह्यात वाहनचालकांकडून ६ कोटी रुपयांचा दंड वसूल

नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनधारकांकडून रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलिसांनी गेल्या सव्वा वर्षांमध्ये तब्बल ६ कोटी १३ लाख १९ हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

रत्नागिरी : नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनधारकांकडून रत्नागिरी जिल्हा वाहतूक पोलिसांनी गेल्या सव्वा वर्षांमध्ये तब्बल ६ कोटी १३ लाख १९ हजार १५० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये विनाहेल्मेट फिरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक आहे.  जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ या सव्वा वर्षांच्या कालवधीत १ लाख ९४ हजार २४ वाहन चालकांवर कारवाई करून ही दंडवसुली झाली आहे. या कारवाईत हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांनी सर्वात जास्त, १ कोटी ७४ लाख ७८ हजार रुपये दंड भरला आहे. याव्यतिरिक्त चारचाकी वाहनात सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहन चालकांकडून २६ लाख  ७५ हजार रुपये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्यांकडून २ लाख २४ हजार रुपये, विमा नसताना वाहन चालवणाऱ्या चालकांकडून १० लाख ८ हजार ८०० रुपये , विनापरवाना वाहनधारकांकडून २७ लाख ५५ हजार रुपये, तर फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांना १७ लाख २७ हजार रुपये दंड वसूल केला आहे. मनाई असलेल्या टापूत वाहन लावणे, दुचाकीवरून तिघाजणांनी प्रवास करणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, अतिवेगात वाहन चालवणे इत्यादी इतर कारणांमुळे एकूण १ लाख ९४ हजार २४ वाहन चालकांना दंड भरावा लागला आहे.

यापूर्वी वाहन चालकांना

थांबवून त्यांच्याकडून रोख स्वरूपात दंड वसूल केला जात होता. मात्र वर्षभरापूर्वी ऑनलाइन चलन पद्धत आल्याने वाहन चालकांशी वाद न घालता केवळ वाहनाचा फोटो काढून कारवाई करणे वाहतूक पोलिसांना शक्य झाले आहे. मात्र दंड आकारणीचे कारण दर्शवणारे छायाचित्र कारवाईसाठी आवश्यक आहे.

दंड न भरल्यास थेट न्यायालयात खटला

वाहतूक नियमांचा भंग केल्यानंतर वाहन मालकाला त्याच्या भ्रमणध्वनीवर दंडाबाबत संदेश जातो. तो आल्यानंतरही दहा ते पंधरा दिवसात दंड न भरल्यास आता थेट न्यायालयात खटला दाखल करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी वाहतूक शाखेने सुरू केली आहे. त्यामुळे आता दंड न भरल्यास कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fine recovered drivers ratnagiri district rules vehicle owners transportation police ysh

ताज्या बातम्या