सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बागायती, डोंगर वणव्यामुळे भस्मसात होत आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असतानाच जीवसृष्टीलाही धोका पोहचत आहे. वणव्यांचा हा प्रयोग दरवर्षी होत आहे.
वणव्यांची कारणे अनेक आहेत. कर्जबाजारी झालेला शेतकरी बागायतीला वणवा लावून बँकांना थकबाकीचे कारण देतो असे एक कारण सांगण्यात येते. तसेच वनजंगलतोड मोठय़ा प्रमाणात होत असल्याने जंगलांना वणवा लावण्याने जंगलतोड करणे शक्य बनते असेही एक कारण पुढे येते.
कणकवली तालुक्यातील पियाळी येथे उसाच्या मळ्यासह कलम बागेला लागलेल्या आगीत सुमारे १३ लाखांचे नुकसान झाल्याचा एक प्रसंग नुकताच घडला. काजूबाग, आंबा बाग, जंगल अशा विविध उत्पन्न देणाऱ्या बागांना वणवे लावण्यात येतात. त्यामुळे  दरवर्षी कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे बोलले जाते.
वणवे लागत असूनही त्यावर पर्याय निवडला जात नाही. या हंगामात पावसाळ्यात उगवलेले गवत सुकते. त्यामुळे एका काडीपेटीची काडीही गवतावर पडल्यास वणवा रौद्ररूप धारण करतो.
वन व पर्यावरण मंत्रालयाने वणवे व वणव्यावर उपाय शोधून काढून पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करावे अशी मागणी होती. वणव्यामुळे जंगली प्राणी सैरावैरा पळतात तसेच जीवसृष्टीलाही धोका पोहोचतो असे सांगण्यात येते.