उत्पादन वाढले, पुढील वर्षी लागवडक्षेत्र वाढवणार

अशोक तुपे, लोकसत्ता

Finance Ministry report predicts a comforting dip in inflation amid forecasted monsoon rains
महागाईत दिलासादायी उताराचा अंदाज; मोसमी पावसाच्या अनुमानाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाचा अहवाल
Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह
Highest production of mustard in the country this year pune news
देशात यंदा मोहरीचे उच्चांकी उत्पादन? १२०.९० लाख टन उत्पादनाचा अंदाज
Loksatta kutuhal Scope of computer vision
कुतूहल: संगणकीय दृष्टीची व्याप्ती

श्रीरामपूर : बदलत्या हवामानाचा मोठा तडाखा शेती क्षेत्राला बसला. अत्यंत संवेदनशील असलेले द्राक्ष पीक त्यातून सुटू शकले नव्हते. देशातील विविध संशोधन संस्थांतील कृषी शास्त्रज्ञ संशोधन करून उपाय शोधत असले तरी त्याला यश आले नव्हते. मात्र आता नाशिकच्या ‘सह्य़ाद्री अ‍ॅग्रो’ने कॅलिफोर्निया आणि चिलीतून आणलेल्या द्राक्षाने प्रतिकूल हवामानातही चांगले उत्पादन दिले आहे. पुढील वर्षी या विदेशी द्राक्षाची लागवड दोन हजार एकरापेक्षा जास्त क्षेत्रात होणार आहे.

हवामानातील बदलाचा द्राक्षावर मोठा परिणाम होतो. धुके, ढगाळ हवामान, अवेळी झालेला पाऊस, अतिथंडी, अतिउष्ण वातावरण यामुळे द्राक्ष उत्पादन घटते. यंदा पाऊस लांबला. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले. भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला. प्रतिकूल हवामानामुळे द्राक्षाच्या घडाला तडे गेले. त्याचा फटका द्राक्ष निर्यातीलाही बसला. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ थॉमसन, सोनाका, शरद सीडलेस, गणेश, मानिकचमन, सुपर सोनाका, बंगलोर परपल आदी जातीच्या द्राक्षांच्या बागांवर संकट आले. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना यंदा मोठा खर्च करावा लागला. पण कॅलिफोर्नियातून आणलेल्या आरा जातीच्या द्राक्षांवर बदलत्या विपरीत हवामानाचा परिणाम झाला नाही. मागील वर्षी ३० एकरावर तर या वर्षी २०० एकरावर उभ्या असलेल्या आरा जातीची द्राक्षे उत्तम पिकली. आता या विदेशी द्राक्षाच्या वाणाची गोडी शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे पुढील वर्षी दोन हजार एकर क्षेत्रांत विदेशी द्राक्षांच्या बागा उभ्या राहणार आहेत.

द्राक्ष पिकासमोर निसर्गाने आव्हान उभे केले आहे. अवकाळी पाऊस आला की बागांचे नुकसान होते. थंडी कमीजास्त झाली की घडाला तडे जातात, घड गळतात. शेतकऱ्यांना बागा वाचविण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. मेहनतही तेवढीच घ्यावी लागते; पण सह्य़ाद्री अ‍ॅग्रोचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी जगातील द्राक्षाच्या शेतीचा अभ्यास केला. कॅलिफोर्नियातील आरा आणि चिलीतील ग्रेपवन या जातीची द्राक्षे प्रतिकूल हवामानातही चांगले उत्पादन देतात. रासायनिक औषधे कमी लागतात. संजीवकाचा वापरही कमी करावा लागतो. उत्पादन चांगले येते. म्हणून त्यांनी २०१४ सालापासून द्राक्षाच्या या विदेशी जाती देशात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याला दोन वर्षांपूर्वी यश आले. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी या जाती संशोधित केलेल्या होत्या. त्याचे पेटंट घेतलेले होते. त्यामुळे स्वामित्व हक्काची रक्कम त्यांना द्यावी लागते. सह्य़ाद्री अ‍ॅग्रो ही शेतकरी उत्पादक कंपनी असून साडेचार हजार कोटींची तिची उलाढाल आहे. अडीचशे कोटी रुपयांचे द्राक्ष कंपनी निर्यात करते. त्यामुळे खासगी कंपन्यांना विश्वास देण्याचे काम सह्य़ाद्री अ‍ॅग्रोचे विलास शिंदे यांनी केले.

आरा द्राक्षाचे पेटंट हे ज्युपिटर या कंपनीकडे आहे. या कंपनीबरोबर त्यांनी करार केला. त्यांची लागवड करण्याकरिता कंपनीच्या शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. ही द्राक्षे उत्पादित होऊन निर्यात झाली किंवा बाजारात विकली गेल्यावर त्यांना शेतकऱ्यांकडून स्वामित्व हक्कापोटी काही रक्कम दिली जाणार आहे. उत्पादन चांगले आले तरच ही रक्कम दिली जाईल. निर्यातक्षम अशी ही द्राक्षे असून सह्य़ाद्री अ‍ॅग्रो त्याची निर्यात करणार आहे. शेतकऱ्यांच्या एका उत्पादक कंपनीने देशात पहिल्यांदाच हा प्रयोग केला आहे.

कपाशीच्या जनुकबदल बियाणाची निर्मिती मोन्सॅन्टो या कंपनीने केली. त्यांनी महिकोच्या माध्यमातून हे बियाणे देशात उपलब्ध करून दिले. नंतर पन्नासहून अधिक बियाणे कंपन्यांनी ते बाजारात लागवडीसाठी आणले. बिटी कपाशीच्या स्वामित्व हक्काचा विषय नेहमीच गाजत राहिला. मात्र सह्य़ाद्री अ‍ॅग्रो या कंपनीने प्रथमच द्राक्षांत पेटंट असलेल्या जाती आणल्या. त्यांची लागवड केली. शेतकऱ्यांच्या एका कंपनीने ऐतिहासिक असे शेती क्षेत्रात हे काम केले. पहिल्यांदाच हे घडले.

वैशिष्टय़ काय? : ज्युपिटर कंपनीच्या आरा जातीची द्राक्षे चोवीस देशांमध्ये लावली जातात. ही द्राक्षे दिसायला देखणी व टिकाऊ आहेत. रंगही त्यांचा चांगला आहे. खायला कुरकुरीत आहेत. त्यात भरपूर गर आहे. उत्तम चव आहे. निर्यातीसाठी तिला मागणीही चांगली आहे. हेक्टरी २७ ते ३५ टन उत्पादन येते. आकार चांगला आहे. थॉमसन जातीच्या द्राक्षाचा आकार हा सोळा ते अठरा एमएम एवढा होता. मात्र आरा जातीच्या द्राक्षाचा आकार हा अठरा ते २६ एमएम एवढा आहे. सरासरी वीस एमएम एवढी साइज आहे. जगभर या जातींना मागणी आहे. या वर्षी परंपरागत द्राक्षाच्या बागांचे प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झाले. मात्र विदेशी द्राक्षाचे नुकसान झाले नाही. चिलीतील आयएनआयए-ग्रेपवन या जातीची द्राक्षेही आणण्यात आली आहेत. रेड आरा-१३, आरा-२९, आरा-३०, व्हाइट आरा-१५, आरा-१९, आरा-२८ या कॅलिफोर्नियातील ज्युपिटर कंपनीने विकसित केलेल्या द्राक्षाची लागवड नाशिक जिल्ह्य़ात करण्यात आली आहे. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या काळातही द्राक्ष शेती पुन्हा एकदा फुलणार आहे.

हवामान बदलामुळे शेती क्षेत्रासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. द्राक्षाच्या बागाही त्यातून सुटल्या नाहीत. कृषी संशोधन संस्था खूप मागे आहेत. जगातही तशीच परिस्थिती आहे. प्रगत देशात खासगी कंपन्यांनी संशोधन करून चांगल्या जातीची लागवड केली. कॅलिफोर्नियातील आरा आणि चिलीतील ग्रेपवन या द्राक्षाच्या जाती विचित्र हवामानाला तोंड देऊ शकतात. हे यंदा सिद्ध झाले. त्या जातीचे पेटंट असल्यामुळे संबंधित कंपनीला उत्पादन आल्यानंतर स्वामित्व हक्काची रक्कम दिली जाणार आहे. आता जुन्या जातीच्या बागा काढून नवीन जातीची द्राक्ष लागवड करावी लागेल. त्याकरिता सह्य़ाद्री अ‍ॅग्रोने ज्युपिटर कंपनीचे मार्गदर्शन घेऊन नर्सरी तयार केली आहे. पुढील वर्षी दोन हजार एकरांत नाशिक जिल्ह्य़ात विदेशी जातीच्या द्राक्षबागा उभ्या राहतील. या द्राक्षाच्या जाती आयात करताना कॉरंटाईलची प्रक्रिया तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.

– विलास शिंदे, अध्यक्ष सह्य़ाद्री अ‍ॅग्रो, नाशिक