आदिवासी वनपट्टेधारकांचा संताप; अतिक्रमण केल्याचा आरोप करून कारवाई

वाडा : वनपट्टय़ात अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून तालुक्यातील देवळी येथे कारवाई करण्यास गेलेल्या वन अधिकाऱ्यांना वनपट्टेधारकांनी पिटाळले आहे. एकीकडे करोनामुळे पुकारण्यात आलेल्या टाळेबंदीत कुठेही रोजगार मिळत नाही त्यातच ही कारवाई झाल्याने संताप वाढला आहे.

तालुक्यातील मौजे हरोसळे, देवळी, करांजे या गावांच्या परिसरातील वन जागेत येथील आदिवासींनी मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण केले असून काहींनी झोपडय़ासुद्धा बांधल्या असल्याचे निदर्शनास आल्याने जव्हार वन विभागाचे उपवनसंरक्षक अमित मिश्रा यांनी हे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र आम्हाला सरकारनेच दिलेल्या वनपट्टय़ामध्येच आम्ही शेत मशागतीची कामे सुरू केली आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण केले नसल्याचा दावा येथील वनपट्टेधारकांनी केला आहे. तेसच वन विभागाची कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप येथील वनपट्टेधारकांनी केला आहे.

मंगळवारी (२ जून) जव्हार वन विभागाचे उपवनसंरक्षक अमित मिश्रा यांच्या आदेशानुसार वाडा येथील वन परिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक असे शंभरहून अधिक वन विभागाचे कर्मचारी देवळी येथील वनपट्टेधारकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करून कारवाई करण्यास गेले होते. मात्र येथील वनपट्टेधारकांनी या  मोठय़ा संख्येने जमाव करून त्यांना पिटाळून लावले. दरम्यान या वेळी वन अधिकारी व वनपट्टेधारक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. या वेळी वन अधिकाऱ्यांनी वनपट्टेधारकांना गुन्हे दाखल करण्याची धमकीही दिली. तर आमच्यावर गुन्हे दाखल कराच असा सडेतोड जबाब वनपट्टेधारकांनी देऊन वन कर्मचाऱ्यांना पिटाळले.

दिलेल्या वनपट्टय़ापेक्षा अधिक वन जागेत अतिक्रमण करून तेथील वनसंपत्ती नष्ट करणे, खोदकाम करणे हे वन कायद्याविरोधात कृत असल्याने ही कारवाई करण्यात येत आहे. वन विभागाकडून अशा प्रकारच्या कारवाया पावसाच्या तोंडावरच का होतात. वनपट्टय़ाच्या जागेत आम्हाला मशागत करण्याचा हक्क नसेल, तर या जागेत पीक कसे घेणार, या जागेचा काय उपयोग करणार?

– सूरज दळवी, वनपट्टेधारक शेतकरी