तारापूर औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज प्रा.लि. या रासायनिक कंपनीतील भट्टीचा शुक्रवारी स्फोट झाल्याने तीन मजली इमारत कोसळून चौघांचा मृत्यू झाला.  शुक्रवारी सकाळी झालेल्या या दुर्घटनेत १६ कामगार जखमी झाले असून रात्री उशिरापर्यंत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका कामगाराचा शोध सुरू होता.
आरती ड्रग्ज या कंपनीत मिथील नायट्रो इमिटाझोलच्या निर्मितीचे काम सुरू असताना भट्टीत नायट्रेटच्या प्रक्रियेमुळे शुक्रवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास स्फोट झाला. हा स्फोट इतका तीव्र होता की, दहा किमी परिसरातील अनेक घरांचे पत्रे तसेच काचा मोडून विखुरले. स्फोटानंतर कंपनीची तीन मजली इमारतही खाली कोसळली व भीषण आग लागली. या अपघातात कंपनीतील अभियंते प्रवीण पाटील, पूजा वडे, सचिन पुजारी, सुरेंद्र सरदार, पी.के. मिश्रा यांचा मृत्यू झाला, तर १६ कामगार जखमी झाले. त्यापैकी दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारतीत अजून एक कामगार अडकला असून त्याला सोडवण्याचे काम सुरू होते.