येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या पुसद येथील ६० वर्षीय करोनाबाधित वृद्धाचा आज सोमवारी मृत्यू झाला. हा रुग्ण १३ जून रोजी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील करोनाबाधित मृतांची संख्या चार झाली आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १८२ झाली आहे. त्यापैकी १४४ रूग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच प्राथमिक स्तरावर नागरिकांमधील कोविड, सारी किंवा आयएलआय सदृष्य लक्षणे शोधण्यासाठी सर्व्हे करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर किंवा तालुकास्तरावर हा सर्व्हे अतिशय काळजीपूर्वक होणे आवश्यक आहे. माणसाच्या जीवन-मरणाशी थेट संबंध असल्यामुळे सर्व्हे करताना कोणताही निष्काळजीपण करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे. यासाठी प्रशासन दक्ष राहून काम करीत आहे. मात्र, ग्रामस्तरावरील समित्यांनी निष्काळजीपणा करू नये. आरोग्य विभागाच्या पथकाने प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील प्रत्येकाची थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटरने तपासणी करावी. पूर्वीपासून मधुमेह, रक्तदाब, हायपरटेन्शन अशा आरोग्य समस्या असलेल्या नागरिकांची तपासणी पुढील पाच-सहा महिने नियमित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. १० वर्षांखालील मुले आणि ५० वर्षांवरील नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.