“प्रसारमाध्यमांच्या गरजा आणि त्याचं स्वरूप काळानुरूप बदलतंय. या काळातही लोकसत्तानं त्यांचं स्वरूप कायम राखलं आहे. त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. आधी फक्त व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटी होती. आता त्यात फेसबुक, इन्स्टा असं सगळंच आलं. हे सगळं सातत्याने बदलतंय. पण वर्तमानपत्रात एकदा बातमी छापली की ती मागे घेता येत नाही. नाटकात जशी रिटेकला संधी नसते, तसंच वर्तमानपत्राचं असतं. आजही माध्यमविश्वात आपलं स्थान कायम राखण्याचं काम लोकसत्तानं केलं आहे”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दैनिक लोकसत्ताने राखलेल्या विश्वासार्हतेचं आज कौतुक केलं. आज मुंबईत दैनिक लोकसत्ताचा ७६ वा वर्धापन दिन पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “फक्त वर्तमानपत्रातल्या बातम्या देण्यापर्यंत त्यांचं काम मर्यादित नाही. जागतिक तेलाच्या अर्थकारणापासून राजकारणातल्या तेल लावलेल्या पैलवानापर्यंत कुबेरांचा गाढा अभ्यास आहे. जागतिक घडामोडींचं त्यांनी केलेलं अभ्यासू विश्लेषण आपल्याला वाचायला मिळतं.”

janardhan reddy return to bjp
खाण घोटाळाप्रकरणी नऊ गुन्हे दाखल असलेल्या माजी मंत्र्याचा भाजपात प्रवेश; यामागचं राजकारण काय?
Kerala CM Pinarayi Vijayan
‘भारत माता की जय’ आणि ‘जय हिंद’ हे नारे रचणारे मुस्लीम होते; केरळच्या मुख्यमंत्र्यांचा दावा
Devendra Fadnavis criticizes the disgruntled and dissatisfied leaders of the party
“बसमध्ये जागा मिळाली नाही की बसमागे दगड मारत धावणारे असतात…”, देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?
udayan raje bhonsle
उदयनराजेंच्या उमेदवारीच्या प्रतीक्षेने साताऱ्यात कार्यकर्ते आक्रमक, भाजपा जिल्हाध्यक्षांनाच घातला घेराव

“मराठी भाषेची समृद्ध परंपरा जपण्यासाठी लोकसत्ता प्रयत्न करत आहे. अनेक मराठी शब्दसंग्रह, मराठीचा जणूकाही शब्दकोषच लोकसत्तातून वाचायला मिळतो. हे प्रयत्न फक्त कौतुकास्पदच नाही, तर ते सगळ्यांनी आत्मसात करायला हवेत. ते अनुकरणीय आहेत”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“पॉलिसी पॅरालिसीसला गिरीश कुबेरांनी धोरण लकवा असा शब्द दिला. आता पुढे निवडणुका आहेत. आमचं सरकार येण्यापूर्वी सरकार होतं. पण त्या सरकारला धोरणलकवा होता. आमचं सरकार आल्यानंतर तो लकवा दूर झाला आणि विकासाचं इंजिन जोरात सुरू झालं”, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

लोकसत्ता वर्षवेध ही एक पुस्तिकाच नाही

“लोकसत्ता वर्षवेध ही एक पुस्तिकाच नाही, तर तो वार्षिक ग्रंथ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वर्षभरातल्या घटनांची माहिती देणारं हे पुस्तक आहे. सर्व क्षेत्रांतील सखोल व अभ्यासपूर्ण मजकुरानं सजलेला हा अंक असतो. गेल्या वर्षभरात जगात, देशात व राज्यातही अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यांचा उल्लेख या अंकात आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाला मिळालेलं यश, भारतात झालेली जी-२० परिषद, आंतरराष्ट्रीय नेत्यांचं मुंबईत येणं, जी-२०चं भारताला अध्यक्षपद मिळणं ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे”, असंही ते म्हणाले.

आम्ही लोकहिताचे निर्णय घेतले

“सर्वसामान्यांचं सरकार राज्यात स्थापन झालं. ते सरकार शक्य तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. उत्तम निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार शेवटी सर्वसामान्य लोकांसाठी असतं. सर्व घटकांसाठी असतं. त्यांच्या प्रगतीसाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची असते. मी आणि देवेंद्रजींनीच पहिली शपथ घेतली. त्यानंतर लगेच मंत्रिमंडळ बैठक घ्यावी लागते. आम्ही दोघंच होतो त्या बैठकीला. पहिल्यापासून शेतकरी, महिला, युवा, तरुणांसाठी आपण निर्णय घेतले. एकही निर्णय सत्ताधाऱ्यांच्या वैयक्तिक लाभाचा आम्ही घेतला नाही. आम्ही घेतलेले सगळे निर्णय लोकहिताचे होते”, असंही ते पुढे म्हणाले.