गजचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी एका पाठोपाठ एक आत्मसमर्पण करत असून १२ लाखांचे बक्षीस असलेल्या कोलु ऊर्फ विकास ऊर्फ सुकांत विनोद पदा (२७) रा. रा. वक्कुर, पोस्टे कोयलीबेडा, ता. आरेच्छा जि. नारायणपूर (छ.ग.) व राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी (३०) रा. जवेली (बु.) ता. एटापल्ली जि. गडचिरोली या दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे.

पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी या आत्मसमर्पणाची माहिती दिली. आत्मसमर्पीत नक्षलवादी कोलु पदा हा सप्टेंबर २०१० रोजी प्रतापपूर दलम सदस्य पदावर भरती झाला होता. नोव्हेंबर २०११ ते सन २०१७ पर्यंत तो सीसीएम सुधाकर याचे सुरक्षा गार्ड म्हणुन कार्यरत होता. त्यानंतर जुलै २०१७ ते डिसेंबर २०२१ पर्यंत कंपनी क्र. १० मध्ये तो सेक्शन कमांडर पदावर कार्यरत होता. कोलू पदा याचेवर तीन खून, सात चकमक, एक दरोडा असे एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत. नक्षलमध्ये कार्यरत असतांना त्याने विविध ठिकाणी ॲम्बुश लावले होते. त्याने लावलेल्या छत्तीसगडमधील मौजा अवालवरसे (छ.ग.) महाराष्ट्रामधील मौजा झारेवाडा, पोयारकोठी, अॅम्बुशमध्ये व ओडीसामधील मौजा गुंडापूरी, कंजेनझरी, चुरामेट्टा या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. त्याने लावलेल्या अॅम्बुशमध्ये गडचिरोली जिल्ह्रातील पोमके कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी जंगल परिसरात १ पोलीस अधिकारी व १ पोलीस जवान शहीद झाले होते.

राजे ऊर्फ डेबो जैराम उसेंडी फेब्रुवारी २०११ मध्ये कसनसूर दलम सदस्य पदावर भरती झाली होती. गडचिरोली जिल्ह्रातील पोमके कोठी हद्दीतील मौजा पोयारकोठी जंगल परिसरात लावलेल्या अॅम्बुशमध्ये १ पोलीस अधिकारी व १ पोलीस जवान शहीद झाले. त्याचेवर एक खून, चार चकमक, एक जाळपोळ असे सहा गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये मौजा मुसपर्शी येथील साईनाथ तव्वे या इसमाच्या खुनात सहभाग होता. पदा याचेवर आठ तर उसेंडी हिचेवर चार लाखाचे बक्षीस होते. नक्षलवाद्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल यांनी केले आहे.