रोहे तालुक्यामधील वरसे येथे रहाणाऱ्या राजकुमार त्रिंबक कराड या ठेकेदारी व्यावसायिकाला, दहा लाख रुपये द्या, अन्यथा सातारा येथे असलेल्या तुमच्या मुलीचे अपहरण करू अशी मोबाइल फोनवरून धमकी देणाऱ्या चार जणांच्या टोळीला रात्री सहा तासाच्या थरार नाटय़ानंतर रोहे पोलिसांनी बेडय़ा ठोकून गजाआड करण्याची यशस्वी कामगिरी केली आहे.
सदर धमकी मिळाल्यानंतर कराड यांनी त्वरित रोहे पोलिसांजवळ संपर्क साधला. पोलीस स्टेशनवर नव्याने नियुक्त पोलीस निरीक्षक मोहन जाधव हे काँ. दगडे, एस. जी. पाटील यांनी मोबाइल लोकेशन पाहून रात्री ९.३० वा. सापळा रचला. सहा तासांच्या टेहळणीनंतर पोलिसांनी मुख्य आरोपी स्वप्नील राजेंद्र पाटील याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस उपनिरीक्षक दिलीप जाधव, जे. पी. पाटील, जे. पी. म्हात्रे आदींच्या सहकार्याने मुख्य आरोपीचे अन्य साथीदार चेतन हरिश्चंद्र चोरगे (२२, रा. निडी, ता. रोहे), गणेश जगन्नाथ घायाल (२०, रा. धनगर आळी रोहे), सुशील नथुराम कोळेकर (१९, रा. देवकान्हे ता. रोहे) यांना त्यांच्याजवळ असलेल्या पिकअप व्हॅनसह ताब्यात घेतले. या चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अल्पावधीमध्ये आरोपींना बेडय़ा ठोकल्याबद्दल रोहे पोलिसांचे कौतुक होत आहे. रोहे पोलिसांनी या चारही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना १५ जूनपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, पोलिसांनी गुन्हेगारांनी वापरलेला मोबाइल फोन, सीमकार्ड आरोपींकडून हस्तगत केली आहेत.