लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सांगली : मांसासाठी रानडुकराची तस्करी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला वन विभागाच्या पथकाने अटक करुन १० जिवंत रानडुकरे ताब्यात घेतली. लातूरमध्ये वाघर लाऊन पकडलेली ही रानडुकर मांसासाठी सांगली व कोल्हापूरला नेण्यात येत होती.

सोलापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरुन रानडुकरांची वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. शनिवारी महामार्गावर बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) पथकर नाक्यावर वनक्षेत्रपाल महांतेश बगले, मदन क्षिरसागर, मानद वन्यजीवरक्षक अजितकुमार पाटील आदींच्या फिरत्या पथकाने सापळा लावला‌. यावेळी सोलापूरहुन येणारा टेम्पो (एमएच ४५ एएफ २६४७) अडवून तपासणी केली असता १० जिवंत रानडुकरे आढळली.

आणखी वाचा-सोलापुरात संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक, अज्ञातांनी नारायण राणेंच्या समर्थनार्थ दिल्या घोषणा

या प्रकरणी अजय पवार, अर्जुन कांचाळे दोघे रा. इसबावी, ता. पंढरपूर, सुखदेव चव्हाण, रावसाहेब चव्हाण, दत्ता खरात सर्व रा. चिंचोली, ता. सांगोला आणि एक अल्पवयीन मुलगा अशा सहा जणांना वन विभागाने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दहा जिवंत रानडुकरासह टेम्पो, वाघर हस्तगत करण्यात आले. ही कारवाई मुख्यवन संरक्षक एम. रामानुजम, उपमुख्य वनसंरक्षक नीता ढेरे, सहायक वनसंरक्षक अजित साजणे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या पथकाने केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang that smuggled wild boars for meat was arrested mrj