गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यांत प्रवासी वाहतूक करणारी मिनिडोअर रिक्षांची संख्या आज काही लाखाच्या घरांत गेलेली असताना रायगड जिल्हय़ात हजारो मिनिडोअर वाहने प्रवासी वाहतूक करीत आहेत. याच वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. महाड तालुक्यातील दासगाव येथील मिनिडोअर रिक्षाचे मालक आयुब कारविनकर यांच्या रिक्षेच्या कागदपत्रामध्ये बनावट फेरफार करण्यात आल्याचे निदर्शनाला आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी पेण आणि महाड पोलीस ठाण्यात संबंधिताच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
महाड तालुक्यातील दासगाव येथील आयुब कारविनकर यांनी दि. २४/०५/२००१ रोजी एमएच-०६ / जे- २८२२ क्रमांकाची मिनीडोअर सहा प्रवासी वाहतूकीचा परवाना असलेली रिक्षा घेतली. परदेशात नोकरीसाठी जाणार असल्याने त्यांनी सदरचे वाहन दि. २५/०१/२०१० रोजी १ लाख ६५ हजार रुपयांना दासगावमधील परिचित असलेले महेंद्र अशोक कदम यांना विकली. मिनिडोअरचा व्यवहार करताना वाहानकर, विम्याची रक्कम कदम यांनी भरण्याची आहे असे ठरले होते. त्या वेळी कदम यांच्या नावाचा वाहतूक परवाना (परमिट) नसल्याने कारविनकर यांनी कदम यांना परवाना वापरण्यास दिला होता. दि.२५/०५/२०११ रोजी वाहतूक परवान्याची मुदत संपत असल्याने नूतनीकरण करण्याचे कदम यांना सांगितले होते त्या प्रमाणे कदम यांनी आपल्या ओळखीच्या एजंटकडून परमिटचे नूतनीकरण करून घेतो असे सांगितले. त्या नंतर कारविनकर नोकरी निमित्त परदेशांमध्ये निघून गेले. त्या नंतर कदम यांनी वाहतूक परवान्याचे नूतनीकरण करताना ओळखीच्या एजंटकडून बनावट नोदणी करून घेतली. रायगड जिल्हय़ांमध्ये सुमारे १५ हजारांपेक्षा मिनिडोअर रिक्षा चालविल्या जात असून त्यांतील अधिकांश मिनिडोअर वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारचे बनावट दस्तऐवज तयार करणारी टोळी सक्रिय झाली असन त्वरित चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आयुब कारविनकर यांनी केली आहे. याप्रकरणी महाड आणि पेण पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकाराची कसून चौकशी करण्याची मागणी केली जाते. पेण येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही कर्मचारी यात असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Jun 2013 रोजी प्रकाशित
रायगडमध्ये मिनीडोअर वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी कार्यरत
गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यांत प्रवासी वाहतूक करणारी मिनिडोअर रिक्षांची संख्या आज काही लाखाच्या घरांत गेलेली असताना रायगड जिल्हय़ात हजारो मिनिडोअर वाहने प्रवासी वाहतूक करीत आहेत. याच वाहनांची बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे.
First published on: 29-06-2013 at 03:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang working on duplicate documents of vehicle