दहावी- बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता राखण्यासाठी लेखी परीक्षेत किमान २५ गुण अनिवार्य करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, दरवर्षी परीक्षेच्या तोंडावर हा निर्णय मागे घेतला जातो. आता २५ गुणांऐवजी किमान २० गुण अनिवार्य करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यामिक शिक्षण मंडळाने पाठवला आहे. मात्र, त्याबाबतही अजून निर्णय झालेला नाही. नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये तरी गुणवत्तेशी केली जाणारी तडजोड थांबणार का? हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे.
नववी ते बारावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी लेखी परीक्षेमध्ये किमान २५ गुण अनिवार्य करण्याचा निर्णय  शासनाने २०१० मध्ये घेतला होता. परीक्षेचा दर्जा राखण्यासाठी नव्या मूल्यमापन योजनेनुसार उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या ३५ गुणांपैकी २५ गुण हे लेखी परीक्षेतच मिळालेले असावेत, अशी अट ठेवण्यात आली होती. त्यानुसार नववीपासून बारावीच्या वर्गापर्यंत टप्प्याटप्प्याने या निर्णयाची अंमलबजावणी सुरूही झाली होती. नववीच्या वर्गासाठी एक वर्षे हा निर्णय अमलात आणला गेला. त्यानंतर दहावीच्या निकालावर परिणाम होण्याच्या भीतीने या निर्णयाची अंमलबजावणी करताना मात्र शासनाने कच खाल्ली. लेखी परीक्षेत किमान २५ टक्के गुण अनिवार्य करण्याच्या निर्णयाबाबत अधिसूचना निघाली नसल्याचे कारण देत दरवर्षी या निर्णयाला परीक्षेच्या तोंडावर स्थगिती दिली जाते. यावर्षी झालेल्या परीक्षेतही लेखी परीक्षेत २५ टक्के गुण मिळवण्याची अट शिथिल करण्यात आली.
नववी, दहावीसाठी परीक्षेमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, गणित या विषयांसाठी २० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन असते. या परीक्षांमधील २० गुणांच्या आधारे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मोठे आहे. शाळेचा निकाल चांगला लागावा यासाठी शाळांकडून विद्यार्थ्यांना उदारपणे गुण वाटण्यात येतात. एखादा अपवाद वगळता विद्यार्थ्यांना सहसा १५च्या खाली गुण दिले जात नसल्याचे शाळेतील शिक्षकांनी सांगितले. या सर्वाचा परीक्षांचा दर्जावर होणारा परिणाम टाळण्यासाठी लेखी परीक्षेत २५ टक्के गुण अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अकरावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांसाठी २५ टक्के गुणांची अट ठेवण्यात आली होती. मात्र, ही अट अमलातच न आल्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने लेखी परीक्षेत २० गुण अनिवार्य करण्याचा नवा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. नव्या शैक्षणिक वर्षांपासून तरी (२०१३-१४) गुणांची ही घासाघीस थांबणार का आणि गुणवत्तेचा आणि दर्जाचा विचार होणार का, हा खरा प्रश्न आहे.
या वर्षीपासून फक्त विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणितच नाही, तर सर्वच विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुणांची अट अनिवार्य करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. प्रात्यक्षिक परीक्षा किंवा तोंडी परीक्षा असलेल्या सर्व विषयांसाठी ही अट लागू करण्याचा हा प्रस्ताव आहे. मात्र, यापूर्वी लेखी परीक्षेत किमान २५ गुण अनिवार्य करण्यात आले होते. त्याऐवजी २० गुण अनिवार्य करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
– सर्जेराव जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडऴ