एक तरुण बारा वर्षांपूर्वी भीषण अपघातातून वाचला होता, या अपघातात त्याची तीन भावंडे ठार झाली होती. मात्र, मंगळवारी त्याच मार्गावर योगायोगाने झालेल्या अपघातात या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात भावडबारी- देवळा मार्गावर हा अपघात घडला. एसटीने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

सुत्रांच्या माहितीनुसार, भावडबारी-देवळा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात तालुक्यातील चितळवेढे येथील दीपक प्रभाकर कुलकर्णी (वय ३९) यांचा जागीच मृत्यू झाला. योगायोग म्हणजे सुमारे एक तपापूर्वी अर्थात बारा वर्षांपूर्वी झालेल्या अशाच एका भीषण अपघातात दीपकच्या कुटुंबाला अपघात झाला होता, यात त्याचे दोन भाऊ व एक बहीण अशा तीन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा कुलकर्णी कुटुंबावर काळाने घाला घातल्याने चितळवेढे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात देवळा-चांदवड या राज्य महामार्गावर भाबडबरी घाटात हा अपघात झाला. या अपघातात ५ जण ठार झाले त्यात कुलकर्णी यांचाही समावेश आहे.

भावडबारी- देवळा मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात; ४ ठार, १५ जखमी

गेल्या तीन पिढ्यांपासून कुलकर्णी कुटुंब चितळवेढे व परिसरातील गावांमध्ये पुजाअर्चा करून गुजराण करत होते. बारा वर्षांपूर्वी या कुटुंबातील मोठी मुलगी, दोन मुले, जावई व नातू देवदर्शनासाठी शनिशिंगणापूर-शिर्डी येथे गेले होते. त्यावेळी झालेल्या भीषण अपघातात दोन मुले व मुलगी असे तीन जण ठार झाले होते. दीपकही त्या प्रवासाला जाणार होता. मात्र, ऐन वेळी त्याचे जाणे रद्द झाले होते, त्यामुळे तो सुदैवाने या अपघातातून वाचला होता.

कमावती झालेली मुले काळाच्या पडद्याआड गेल्याने प्रभाकर कुलकर्णी यांनी उदरनिवाहासाठी पुन्हा पौराहित्याचा व्यवसाय सुरू केला होता. पुढे दीपकही मोठा झाल्यावर वडिलांना मदत करू लागला. अल्पावधीतच एक चांगला पुरोहित म्हणून त्याने नाव मिळविले. दीपकशास्त्री या नावाने तो परिसरात परिचित होता. कुटुंबातील तीन जणांच्या मृत्यूचे दुःख पचवून हे कुटुंब पुन्हा सावरले होते. मात्र, आज पुन्हा या कुटुंबावर काळाने मोठा घाला घातला. दीपकच्या मागे दोन मुले, पत्नी, आई-वडील असा परिवार आहे.