नगर शहरात आज, रविवारी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या सरी सायंकाळपर्यंत कोसळत होत्या. शहरातील बहुतेक रस्ते जलमय झाले होते. सीना नदीही दुथडी भरून वाहत होती. जिल्ह्य़ाच्या बहुतांशी भागात पावसाने आज हजेरी लावली.
नगर शहरात गेल्या चार दिवसांपासून सलग पाऊस सुरू आहे. कालही जोराचा पाऊस झाला. मान्सूनच्या आगमनाने शेतकरी आनंदी झाला आहे. हवेतही चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. दिवसभराच्या पावसाने शहराचे जनजीवन काहीसे विस्कळीत करून टाकले होते. रविवारची सुट्टी व दिवसभर कोसळणारा पाऊस यामुळे नगरकरांनी आजचा दिवस घरात बसूनच काढला. सायंकाळी पावसाचा जोर ओसरून त्याने काहीशी विश्रांती घेतली.
शहरातील नालेसफाईअभावी अनेक भागांत पावसाचे पाणी तुंबून रस्त्यांवर साचले होते, त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला होता. नालेगाव, बालिकाश्रम रस्त्यावरील काही घरातून पाणी शिरले. आजच्या पावसाने रस्त्यांना पूर्वीच असलेले खड्डे अधिकच रुंद केले. बहुतेक रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकही हैराण झालेले आहेत. सीना नदीच्या उगम भागात मोठा पाऊस झाल्याने शहरातून जाणारी नदी दुथडी भरून वाहात होती. ते पाहण्यासाठी सायंकाळी नागरिकांनी नेप्ती पूल तसेच स्टेशन रस्त्यावरील लोखंडी पुलावर गर्दी केली होती.
जिल्ह्य़ात आज सकाळी आठ वाजता नोंदवलेला गेल्या चोवीस तासांतील झालेला पाऊस असा (आकडे मिमी. मध्ये)-नेवासे २, नगर २९, शेवगाव २८, पाथर्डी ९, कर्जत १०, जामखेड १३.१. एकूण ९०.१.