scorecardresearch

सांगलीतील जि.प. पेपरफुटीमध्ये उच्च पदस्थ अधिका-यांचा सहभाग

आरोग्यसेविकाच्या परीक्षेतील कॉपीचा प्रकार महिला परीक्षार्थीकडून उघडकीस

जिल्हा परिषदेतील नोकरभरतीसाठी झालेल्या परीक्षेतील कॉपी प्रकारामागे पेपरफुटीच कारणीभूत असून, यामागे परीक्षा समितीतील उच्चपदस्थ अधिकारी सहभागी असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. आरोग्यसेविकाच्या परीक्षेतील कॉपीचा प्रकार महिला परीक्षार्थीकडून उघडकीस आला असला तरी यामागे मोठी आíथक देवघेवही झाली असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
जिल्हा परिषदेतील आरोग्यसेविका व आरोग्यसेवक भरतीसाठी सांगलीमध्ये निवड समितीच्या माध्यमातून २५ नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा झाली. या वेळी करगणीची उमेदवार शाहिन जमादार हिने प्रश्नांची उत्तरे पायजम्यावर लिहून आणल्याचे निदर्शनास आणले होते. ही बाब उघड होताच तिने बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने कपडे बदलण्याचा प्रयत्न केला. या वेळी सेवेत असलेल्या शाकिरा उमराणी हिने तिला मदत केली. या दोघींविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापकी उमराणी ही कायम सेवेत असणारी आरोग्यसेविका तर जमादार ही कंत्राटी आरोग्यसेविका होती.
पोलिसांनी या दोघींना अटक केली असता तपासात या दोघींकडून महत्त्वाची माहिती प्राप्त झाली आहे. या दोघींच्या जबाबातून परीक्षेपूर्वीच उत्तरासहित प्रश्नांची माहिती मिळाली होती. यामागे तीन आरोग्यसेवकांची नावे पोलिसांना मिळाली आहेत. या पेपरफुटीची पोलिसांनीही गांभीर्याने दखल घेतली असून, उपअधीक्षक प्रकाश गायकवाड हे स्वत: या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
परीक्षेपूर्वी काही मंडळी पेपरच्या उत्तरासाठी ग्राहक शोधत असल्याचे तपासात स्पष्ट झाले असून, यासाठी सात लाख रुपयांचा दर होता. परीक्षा समितीत असलेल्या लोकांची माहिती प्रशासनाकडे मागण्यात आली असून, परीक्षेतील प्रश्न आणि त्यांची उत्तरे तयार करणारे कोण कोण होते, संगणकावर प्रश्नपत्रिका टाकणे आणि त्याची उत्तरे तयार करणारे कोण होते, याची माहिती पोलिसांनी निवड समितीकडे मागितली आहे.
पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली. याऐवजी गेल्या रविवारी २९ नोव्हेंबर रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली. याशिवाय अन्य ग्रामसेवकसह अन्य काही पदांसाठीही परीक्षा घेण्यात आली असून, सर्व परीक्षाच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: High ranking officials involved in the zp paper leakage in sangli

ताज्या बातम्या